Loksabha Election 2024 : लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची दिल्लीत होणार बैठक, उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीवारी करण्याची शक्यता
Loksabha Election 2024 : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरु आहे. त्यातच आता नव वर्षात दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : लोकसभेच्या (Loksabha election 2024) जागावाटपाबाबत सध्या बराच संभ्रम निर्माण आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरु देखील सुरु आहे. दरम्यान नव वर्षात म्हणजेच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा होणार असल्याची माहिती समोर येतेय. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत ही बैठक होणार आहे. जानेवारी 2 किंवा 3 तारखेला ही बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही तारीख ठरलेली नसल्याचं सांगण्यात येतंय. तसेच या बैठकांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात काँग्रेसच्या आजच्या चर्चेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. त्याच चर्चेसाठी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील लोकसभा जागेंचा तिढा हा काही केल्या सुटत नाहीये. जागावाटपावर निर्णय होण्याआधीच ठाकरे गटाकडून 48 पैकी 23 जागांचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आलाय. या जागा लढण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम तर दुसरीकडे काँग्रेसने ठाकरे गटाचा हा प्रस्ताव थेट अमान्य केलाय.
महाविकास आघाडीचा जागावाटपांचा फॉर्म्युला दिल्लीत ठरणार?
सध्या जागावाटपावरुन बरेच वाद निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जात होतं. संजय राऊतांनी म्हटलं होतं की, काँग्रेसचं हायकमांड हे दिल्लीत असतं, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीत होईल. यामुळे महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील जागावाटपांचा निर्णय हा दिल्लीत होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं.
दिल्लीत जरी जागावाटपाबाबत बैठक होत असली तरी शिवसेना ठाकरे गट आपल्या 23 जागा आणून कमी जागा लढवण्यास तयार नाही. मागच्या लोकसभेत शिवसेनेने ज्या जागा लढवल्या त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार यावर पक्ष ठाम आहे. सोबतच ज्या 18 जागा शिवसेनेने जिंकल्या त्यावर कुठलीही चर्चा होणार नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मागील इंडिया आघाडीच्या बैठकी दरम्यान ठाकरे गटाकडून राज्यातील ज्या 23 लोकसभा शिवसेना ठाकरे गट लढवणार ठाम आहे. त्यामुळे या बैठकांमध्ये जागावाटपाबाबत काय निर्णय होणार आणि महाविकास आघाडीत कोणतं समीकरण ठरणार याची उत्सुकता सध्या राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.
हेही वाचा :