Nitin Gadkari: विकासकामात सर्वाधिक खोडा घालणारे वनविभाग हेच ‘झारीतील शुक्राचार्य’, प्रचार सभेत नितीन गडकरी स्पष्टच बोलले; म्हणाले...
गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडवताना सर्वाधिक खोडा घालणारा वनविभाग हेच ‘झारीतील शुक्राचार्य’ असून त्यांना घेराव घातला पाहिजे, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावलाय.
Lok Sabha 2024 गडचिरोली : नागपूर ते देसाईगंज, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते चंद्रपूर अशा ब्राडगेज मेट्रो सुरू करण्याचे आमचे लक्ष असून अवघ्या 1 तास 20 मिनीटात वातानुकूलित प्रवास गडचिरोलीकरांना घडवू, असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देसाईगंज येथील प्रचार सभेत दिले आहे. गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडवताना सर्वाधिक खोडा घालणारा वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’ असून त्यांना घेराव घातला पाहिजे. असा टोलाही नितीन गडकरी यांनी लगावलाय. ते गडचिरोली-चिमूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते (Ashok Nete) यांच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आयोजित सभेत बोलत होते.
तरुणांची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या नक्षलच्या मार्गावर वळवण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यात जस-जसा विकास होत जाईल, तसे हे युवक परत रोजगारासाठी माघारी येतील आणि एकदिवस येथील नक्षलवाद संपूर्ण समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही नितीन गडकरींनी बोलताना व्यक्त केलाय.
अवघ्या दोन तासात गडचिरोली ते नागपूर प्रवास
गडचिरोली जिल्हा हा निसर्गसंपन्न असा जिल्हा असून इथे निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. सोबतच या जिल्ह्यामध्ये रस्ते, रेल्वे, हॉस्पिटल, विमानतळ, मोठ्या इंडस्ट्रीज इत्यादी सारख्या गोष्टींचा विकास होत आहे. त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा विकसित, प्रगतशील आणि सर्वार्थाने संपन्न असा जिल्हा म्हणून नावारूपास येईल, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केलाय. अशोक नेते यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षात या जिल्ह्यातील रस्ते आणि रेल्वेचे प्रश्न मार्गी लागले आहेत. गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे. 180 किलोमीटरचा हा रस्ता असून पूर्वी या मार्गाने प्रवास करतांना चार ते साडे चार तास लागत होते. मात्र, अलीकडे झालेल्या विकासकामामुळे अवघ्या दोन तासात आपण नागपूरला पोहचू शकतोय.
वनविभाग हेच 'झारीतील शुक्राचार्य'
आगामी काळात आम्ही नागपूर ते देसाईगंज, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती, नागपूर ते छिंदवाडा, नागपूर ते गोंदिया अशी लांब पल्ल्याची ब्रॉडगेज मेट्रो आपण लवकरच सुरू करत असल्याचेही गडकरी म्हणाले. एअर कंडिशन आणि अतिशय अल्पदरात हा प्रवास असून यात अगदी विमानात मिळत असलेल्या सुखसोयी या मेट्रोमध्ये मिळाव्या, असा आमचा प्रयत्न असल्याचेही गडकरी म्हणाले. मी नुकतेच 1600 कोटी रुपयांचे आठ कामे मंजूर केले आहेत. त्यातील दोन कामे हे पूर्ण झाले असून उर्वरित सहा कामे फॉरेस्ट डिपार्टमेंट ने अडवून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न सोडवताना सर्वाधिक खोडा घालणारे वनविभाग हेच झारीतील शुक्राचार्य असून इथल्या नागरिकांनी त्यांना घेराव घातला पाहिजे, असा टोलाही गडकरींनी लगावला आहे.
78 हजारहून अधिक झाडे ट्रान्सप्लांट
निसर्गाचा समतोल हा राखलाच पाहिजे. पेट्रोल, डिझेलचा अतिशय कमी वापर करण्याचा निर्धार मी केला असून बायोडिझेल, बायो पेट्रोल, इथेनॉल, हायड्रोजन, सीएनजी, इलेक्ट्रॉनिक वाहन, इत्यादि पर्यायी मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. या देशातले प्रदूषण हे कमी व्हायला पाहिजे, असे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. आजवर जवळ जवळ 78 हजारहून अधिक झाडे आम्ही ट्रान्सप्लांट केली आहेत. अलीकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटने या सहाही कामाला परवानगी दिली असून आगामी काळात 1600 कोटी रुपयांची विकासकामे लवकरच पूर्ण होतील असे विश्वासही नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या