(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laxman Hake VIDEO : सुरेश धस सातवी पास, त्याला मंत्री करण्यापेक्षा मला गृहखातं, अर्थखातं द्या; विधानपरिषद नको, कॅबिनेट द्या, लक्ष्मण हाकेंची मागणी
Laxman Hake Demanded Cabinet Ministry : सातवी पास असलेल्या सुरेश धसासारख्या माणसाला तुम्ही मंत्रीपद देणार असाल तर माझी लायकी जास्त आहे, ज्ञान जास्त आहे असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
मुंबई : सुरेश धसासारख्या सातवी पास माणसाला जर मंत्रिपद देणार असाल तर माझी लायकी आणि ज्ञान पाहून मला मंत्रिपद द्या अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. मला राज्यात गृहखातं, अर्थखातं द्या, नाहीतर केंद्रात मंत्रिपद द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. राज्यात ओबीसी असलेल्या अर्ध्या लोकांचं मी नेतृत्व करतो, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जे माध्यम मिळेल ते घेईन असंही सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
विधानपरिषद नको, कॅबिनेट द्या
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानतंर तुम्ही विधानपरिषदेवर जाणार का असा प्रश्न विचारल्यानंतर लक्ष्मण हाके म्हणाले, "विधानसपरिषद नको, माझी लायकी त्याहून मोठी आहे. मला राज्यात गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा शिक्षणमंत्री करा. त्या सातवी-आठवी पास असलेल्या सुरेश धसला जर तुम्ही मंत्री करणार असाल तर त्यापेक्षा मला करा. माझी लायकी जास्त आहे, ज्ञान जास्त आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणार."
राजेश टोपे, जरांगे, पवारांचा करेक्ट कार्यक्रम केला
लक्ष्मण हाके म्हणाले की, "ओबीसींनी त्यांचा प्रभाव दाखवला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या आगोदरच सांगितलं होता की दुप्पट हरियाणा पॅटर्न असेल. माझ्यामुळे अनेक उमेदवार आले आणि अनेकजण पडले. जरांगे, टोपे, शरद पवार हे हवेत होते, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. राजेश टोपे यांची 25 वर्षांची सत्ता ही 2500 मतांनी घालवली. रोहित पवारांचे कान कापून विजय साजरा केला."
आम्ही 9 ठिकाणी उमेदवार घेतली. त्यांनी हजारो मतं घेतली. जरांगेसारखी शेपूट घालून पळून गेलो नाही. इतर ठिकाणी आम्ही महायुतीला पाठिंबा दिला होता असं लक्ष्मण हाके म्हणाले. गेल्या विधानसभेला धनगर समाजाचा एकच आमदार होता, आता सात आमदार झाले आहेत. उत्तम जानकरांना आम्ही निवडून आणलं असंही ते म्हणाले.
ज्यांच्या नावाने मतं मागितली, ज्यांचा चेहरा या निवडणुकीत वापरला त्यालाच मुख्यमंत्री करा असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांच्या नावाला संमती दर्शवली.
महायुतीची जोरदार मुसंडी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून आलं. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत.
ही बातमी वाचा: