Kolhapur Police : जयश्री देसाई कोल्हापूरच्या नुतन अप्पर पोलिस अधीक्षक; जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Kolhapur Police : राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिस दलामध्ये मोठे फेरबदल करताना तब्बल 104 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कोल्हापूरमधील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
Kolhapur Police : राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिस दलामध्ये मोठे फेरबदल करताना तब्बल 104 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरमधील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक तिरूपती काकडे यांची मुंबईला फोर्स वनमध्ये पदोन्नतीने बदली झाली आहे. कोल्हापूरमध्ये त्यांच्या जागी जयश्री देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. देसाई सध्या रत्नागिरीत अप्पर अधीक्षक पदावर कार्यरत होत्या.
दरम्यान, गडहिंग्लज विभागाच्या अप्पर अधीक्षकपदी निकेश खाटमोडे-पाटील यांची नेमणूक झाली आहे. गडहिंग्लज येथील अप्पर अधीक्षक जयश्री जाधव यांची रत्नागिरी येथे अप्पर अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. कोल्हापूरच्या नवीन अप्पर अधीक्षक जयश्री देसाई सातारा जिल्ह्यातील आहेत. दुसरीकडे निकेश खाटमोडे-पाटील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आहेत. त्यांनी सांगली तसेच मुंबईत जबाबदारी पार पाडली आहे.
पदोन्नती मुंबईत फोर्स वनमध्ये बदली झालेल्या तिरूपती काकडे यांनी जानेवारी 2018 मध्ये कोल्हापूर अप्पर अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. सलग पाच वर्षे काकडे कोल्हापूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांची मुंबई पोलिस दलात फोर्स वनचे पोलिस अधीक्षक म्हणून नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यात सहायक तपासाधिकारी होते. गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री जाधव यांनी 13 ऑक्टोबर 2020 मध्ये पदभार स्वीकारला होता.
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पोलिस अधिकारी प्रणय अशोक यांची मुंबईहून नवी मुंबईला तर मंजुनाथ शिंगे यांची सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून राज्य पोलिस महासंचालक कार्यलयात नियुक्ती करण्यात आली आहे. चर्चेत राहिलेले डीसीपी अकबर पठाण पुन्हा मुंबईत आले आहेत. पठाण आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासह सात जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली झाले त्यांनी मिळालेल्या नव्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया देखील येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे. त्यामुळे बदली झालेले वरिष्ठ अधिकारी पुढील दोन ते तीन दिवसांत बदलीच्या ठिकाणी हजर होतील. प्रियांका नारनवरे,भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता जी. पाटील, राहुल उत्तम श्रीरामे, सागर पाटील, विवेक पाटील, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, स्वप्ना गोरे, प्रकाश गायकवाड, दिपाली काळे यांच्यासह राज्यातील 109 अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या