कोणत्या फाईलवर स्वाक्षरी करावी हा राज्यपालांचा अधिकार, पण... : अजित पवार
Ajit Pawar on Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी लोकशाही संकेत, परंपरांचे पालन करावे अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
Ajit Pawar on Governor Bhagat Singh Koshyari : कुठल्या फाईलवर सही करायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार महामहीम राज्यपालांना असतो. लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांच पालन राज्यकर्ते करतील. राज्यपालांनी पण केलं पाहिजे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राज्यपालांकडे गेला आहे. त्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावरून राज्यात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष दिसत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत दुरुस्ती करणारा प्रस्ताव सरकारने पाठवला आहे. या प्रस्तावाला भाजपनेही विरोध केला आहे. त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. अजित पवार म्हटले की, आम्ही राज्यपालांकडे फाईल पाठवली. काल मी दिवसभर पुणे दौऱ्यावर होतो, रात्री बारामती आणि सकाळी आता सिंधुदुर्गमध्ये, दुपारी रत्नागिरीला असणार आहे. संध्याकाळी मुंबईत गेल्यानंतर त्याची माहिती घेणार आहे. शेवटी कुठल्या फाईलवर सही करायची हा सर्वस्वी अधिकार महामहीम राज्यपालांना असतो. लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांच पालन राज्यकर्ते करतील. राज्यपालांनी पण केलं पाहिजे असे पवार यांनी म्हटले.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक आज ओरोस येथे पार पडली. त्यानिमित्ताने अजित पवार सिंधुदुर्गमध्ये उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी या बैठकीला उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना देण्यासाठी आपल्याकडे चौदाशे कोटी रुपये बाकी होते. पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यात नैसर्गिक संकट आलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे देणे बाकी होता तो आता चौदाशे कोटी मंजूर झाल्यामुळे सगळे प्रश्न निकाली निघालेले आहेत असे अजित पवार यांनी म्हटले.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे आणि कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या अनुषगांने करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.