Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ असलेल्या श्रीधर पाटणकर यांच्यावर आता ईडीने कारवाई केली आहे.
मुंबई: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.
ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.
ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत.
महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.
काय आहेत आरोप?
चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha