Gadchiroli : सूरजागड लोहखनिज प्रकल्पात 2000 स्थानिक आदिवासींना रोजगार, युवक-युवतींना नियुक्तीपत्रे प्रदान
गडचिरोलीतील महत्त्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पात आजचा दिवस खास ठरला. 2000 स्थानिक आदिवासी युवक युवतींना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोजगार नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
![Gadchiroli : सूरजागड लोहखनिज प्रकल्पात 2000 स्थानिक आदिवासींना रोजगार, युवक-युवतींना नियुक्तीपत्रे प्रदान Employment to 2000 local tribals in Surjagarh Iron Ore Mining Project, appointment letters given to the youth Gadchiroli : सूरजागड लोहखनिज प्रकल्पात 2000 स्थानिक आदिवासींना रोजगार, युवक-युवतींना नियुक्तीपत्रे प्रदान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/e184685d6714b3e203d8d40e9c69f75f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सूरजागड लोहखनिज प्रकल्पात आजचा दिवस खास होता. 2000 स्थानिक आदिवासी युवकांना आज (14 एप्रिल) पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोजगार नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. अतिदुर्गम भागातील नक्षलवाद संपवायचा असेल तर विकास महत्त्वाचा असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
स्थानिकांना इथल्या खाणीत रोजगार या महाकाय प्रकल्पातील कळीचा मुद्दा होता. पारंपरिक आदिवासी नृत्ये सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. चालक, गार्ड, क्रेन चालक, क्रशर चालक, कामगार अशी नियुक्तीपत्रे स्थानिक युवक-युवतींना देण्यात आली. पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खाण परिसरात रुग्णालय, प्रशिक्षण अकादमी आदी सुविधांची सुरुवात झाली. या दक्षिण गडचिरोली भागात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता पालकमंत्री शिंदे यांनी बोलून दाखवली. अतिदुर्गम भागातील नक्षलवाद संपवायचा असेल तर विकास महत्त्वाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागाला भारताचे नवे जमशेदपूर करण्यासाठी रेल्वे जाळे पसरवण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त झाली.
दक्षिण गडचिरोलीच्या एटापल्ली परिसरातील प्रशिक्षित युवक-युवतींना सुरजागड लोहखनिज प्रकल्पात नोकरी दिल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोजगार निर्मिती करुन या भागाचा जलद विकास साधला जाईल अशी सार्वत्रिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ज्या भागात एकेकाळी एखादी वाहन येणे दुर्मिळ असायचं त्या भागातील आदिवासी मुली volvo सारख्या मोठ्या गाडीपासून लक्झरी गाडी चालवताना दिसत आहेत. कार्यक्रमाच्या समारोपानंतर परत जाताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक आदिवासी युवतीने स्वतः गाडी चालवत हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवले हे विशेष.
सूरजागड लोह खनिज प्रकल्पातील कच्चे लोखंड गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी भागात प्रक्रिया प्रकल्प उभारुन पोलाद निर्मिती केली जाणार आहे. जानेवारी 2023 पर्यंत कोनसरी प्रकल्प यासाठी सज्ज झाला असेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. सूरजागड प्रकल्पात स्थानिक आदिवासींना रोजगार नियुक्तीने विकासाला चालना मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)