(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोकणात आघाडीत बिघाडी! 'नाव राष्ट्रवादी-काम कुटुंबवादी' म्हणत भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
कोकणात शिवसेना (Shiv Sena )आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहेत. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
चिपळूण : महाराष्ट्रात सध्या आघाडीचे सरकार म्हणजेच शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन केली. यात काहींना मंत्री पदे मिळाली तर काही न मिळाल्याने नाराजी पत्करावी लागली. सध्या तिन्ही पक्षांतील नेत्यांत कुरबुरीच्या अनेक घटना समोर येताना दिसतात. आता कोकणात पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याचे पुढे आले आहे. कोकणातील दोन दिग्गज नेते कुणबी समाजाच्या विधानसभेच्या तिकिटावरुन आमनेसामने आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहेत. कोकण शिवसेना उप प्रवक्ते गुहागर आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुनील तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती- भास्कर जाधव
भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की, आपल्या घराण्यासाठी म्हणजेच केवळ नाव राष्ट्रवादी आणि काम मात्र आयुष्यभर कुटुंबवादी. हा शिक्का पुसावा म्हणून मी त्यांना सल्ला दिला होता की, कुणबी समाजालाही जागा सोडावी. कुणबी समाजाला जागा मिळाली म्हणजे त्यांचा अपमान होईल असं त्यांना का वाटत? असा सवालही जाधव यांनी केला. विधानपरिषदेच्या आमदारकीची योग्यता केवळ आमच्याच घराण्यात आहे आणि कुणबी समाजात ती योग्यता नाही असं बोलून त्यांनी कुणबी समाजाचा अपमान केला की सन्मान केला? राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ असं म्हणत त्यांनी माझ्यावर खोचक आणि उपरोधिक भाष्य केलं. मला त्यांना सांगितलं पाहिजे की, मार्गदर्शन करण्यासाठी ज्याचे आचार, विचार चांगले असतात,वर्तन स्वच्छ असते, राजकीय कारकिर्द स्वच्छ असते त्याला मार्गदर्शन करणं योग्य आहे. तटकरेंनी खोट्या कंपन्या स्थापन करुन गोरगरिबांच्या हजारो एकरच्या जमीन घेतल्याचा आरोप तुमच्यावर होत आहे. अशा तुमच्यासारख्या महान माणसाला मार्गदर्शन करणं माझ्या अखत्यारितील गोष्ट नाही असंही भास्कर जाधव म्हणाले. सुनील तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती आहे,द्यायचं माहीत नाही. सुनील तटकरे यांना खासदार करण्यात माझं योगदान आहे. तटकरेंना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कायमच वाटोळं केलं आहे असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
वादाची सुरुवात कुठून झाली..
गेल्या महिन्यात दापोलीमध्ये जयंत पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचा भव्य मेळावा झाला. यात शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. त्यात कुणबी समाजाचा महत्वपूर्ण प्रवेश होता. त्यामुळे दापोलीतील शिवसेनेचा बालेकिल्लाच्या संरक्षणाच्या तटबंधीचा एक भाग ढासळत चालला. याचे कारण शोधत भास्कर जाधव यांनी लोटे येथील शिवसेना कार्यकर्ते मेळाव्यादरम्यान खुलासा केला. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पैसे देऊन आपल्या पक्षात प्रवेश केला. कुणबी समाजाच्या एका वास्तूसाठी जो निधी देण्यात आला तो सरकारच्या तिजोरीतून देण्यात आला आणि त्याच त्यांनी राजकरण केले. तो निधी आम्हीच आणला, दिला असे म्हणून प्रवेश करुन घेतला.
यावरून दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे दापोली येथे आले असता त्यांनी पत्रकारपरीषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत भास्कर जाधवांनी कुणबी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं ते दुर्दैवी आहे, असं तटकरेंनी म्हटलं. ज्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला अशा माणसाकडून मी नक्कीच मार्गदर्शन घेईन असे खोचक वक्तव्य केले.
अनंत गीते यांचीही टीका
सप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. एका कार्यक्रमात भाषण करताना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. अनंत गिते यांनी म्हटलं होतं की, राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये. आघाडी आघाडीचं पाहून घेईल.शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही. या आघाडीत तीन घटक आहेत. शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. हे एकमेकांचे तोंड पाहत होते का,यांचं एकमेकांचं जमतय का,यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही असंही अनंत गिते म्हणाले होते. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून अनंत गीते पुढे म्हणाले होते. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही.जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार, असंही गीते यांनी म्हटलं होतं.