Coronavirus Vaccination : नंदुरबारमध्ये प्रशासनाकडून रात्रीचा दिवस! दुर्गम भागात रात्रीच्या लसीकरणावर भर
Coronavirus Vaccination : नंदुरबारमध्ये कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
Coronavirus Vaccination : कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी झाले होते. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाने रात्रीचा दिवस केला आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी लसीकरणावर भर दिला जात आहे.
राज्यात सर्वात कमी लसीकरण नंदुरबार जिल्ह्यात झाले होते. लसीकरण कमी होण्यामागे काही कारणेदेखील होती. जिल्ह्याची भौगालिक परिस्थिती आणि दिवसा कामासाठी जाणारे मजूर यामुळे लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यावर उपाय शोधत रात्रीचे लसीकरण सुरु केले. सध्या याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील भौगालिक परिस्थिती तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने लसीकरणा संदर्भात असलेले समज आणि गैरसमज असल्याने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनाच्या समोर होते. यावर उपाय म्हणून 'हर घर दस्तक' मोहीम सुरु झाली. मात्र, रोजगारासाठी सकाळी मजूर घराबाहेर पडत असल्याने पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी लसीकरण सुरु करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात आशा ,अंगणवाडी सेविका आणि आरोग्य यंत्रणा रात्र आणि दिवस काम करत असल्याची माहिती समुदाय वैद्यकीय अधिकारी कीर्ती सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मजूर रोजगारासाठी बाहेर जात असतात व सायंकाळी परत येतात. याच काळात लसीकरणाचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. जिल्ह्यात दिवसा ७ ते ८ हजार डोस दिले जातात. तर, रात्रीच्या लसीकरण कॅम्पमध्ये दररोज १० ते १२ हजार डोस दिले जात आहेत. रात्रीच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही मोहीम रात्री अशीच चालू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.
रात्रीच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजगारासाठी अनेकजण दिवसा कामासाठी बाहेर जात असतात ते रात्री परत येत असल्याने रात्रीच्या लसीकरणाचा फायदा होत असल्याचे गावकरी सांगतात. मात्र, स्थलांतर झालेल्या नागरिकांचे जे जिथे गेले आहेत. त्या ठिकाणी लसीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली. नंदूरबार जिल्ह्यामधील लसीकरणाची टक्केवारी 67.18 टक्के इतकी आहे. जवळपास 9 लाख 54 हजार 141 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 5 लाख 13 हजार 106 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.