(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis Majha Katta : 35 पुरणपोळ्या खाण्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, विनंती करत म्हणाले...
35 पुरणपोळ्या खाण्याच्या बाबतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी लोकांना विनंती देखील केली.
Devendra Fadnavis Majha Katta : पुरणपोळी खाण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. मी जिथे जातोय तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहेत. पण मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की, मला पुरणपोळी आवडत नाही. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी देऊ नका, असे स्पष्टच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बरेच राजकीय आणि आपल्या खासगी आयुष्यातील किस्से यावेळी सांगितले.
मी जिथे जातोय तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहेत असं वैतागून देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, ''आमचं जन्मात कधी भांडण झालं नाही. मात्र, आता सगळीकडे लोक त्यांना पुरणपोळी देतात, मग ते घरी येऊन माझ्यावर चिडतात. म्हणून मला स्पष्ट करावं लागेल की, देवेंद्र यांच्या लहानपणीचे एक मित्र आहेत. त्यांनी लग्नाआधी मला सांगितलं होत की, देवेंद्र यांनी एका स्पर्धेत, लग्नाच्या पंक्तीत 30 ते 35 पोळ्या खाल्या आणि ते जिंकले. मात्र लग्नानंतर माझ्यासमोर त्यांनी अर्धी पूणपोळी देखील खाली नसल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, एबीपी माझावरुन मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की, मला पुरणपोळी आवडत नाही. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी नको, असे ते म्हणाले.
मी न बोलणाऱ्या देवेंद्रच्या प्रेमात पडली होती. ते बाहेरच बोलतात. माझ्यासमोर त्यांची बोलती बंद असते, असं अमृता फडणवीस बोलताच एकच हशा पिकला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक प्रामाणिकपणे मान्य करतात की त्यांची पत्नीसमोर बोलती बंद होते. तर काही लोक मान्य करत नाही. 99 टक्के पती असे असतात ज्यांची बोलती बंद होते. जे 1 टक्के असतात त्यांना वेगळं व्हावं लागत.