(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya : मुंबईत राडा सुरूच, शिवसैनिकांच्या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमी
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्या जखमी झाले आहेत.
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला असून त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. राणा दाम्पत्याची भेट घेऊन परतत असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. दरम्यान, किरीट सोमय्या हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.
राणा दाम्पत्याला आज खार पोलिसांनी अटक केली. त्यांची रात्र आज खार पोलीस स्टेशनमध्येच जाणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटायला गेले होते. राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटल्याचं सांगितलं जातंय. तसेच किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याचं दिसून येतंय.
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले की, "पोलिसांच्या उपस्थितीत मला मारहाण केली. पोलिसांच्या उपस्थितीत गुंड पोलीस स्टेशनच्या आवारात शिरतात. शिवसैनिकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होत नाही, तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही."
किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याच्या हेतूने हा हल्ला झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, "पोलीस स्टेशनच्या आवारात हा हल्ला झाला असून राज्याची अवस्था ही पश्चिम बंगालपेक्षा वाईट झाली आहे. पोलिसांनी राणांवर गुन्हा दाखल केला पण शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला नाही. राज्य शासन पोलिसांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहे. याचं उत्तर आता भाजप त्याच प्रकारे देईल."
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरने आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: