Bhagat Singh Koshyari : एक राज्यपाल आणि 10 वाद ! कधी ठाकरेंशी पंगा तर कधी महात्मा फुलेंवरुन वादग्रस्त वक्तव्य
Bhagat Singh Koshyari : कोश्यारींची विधानं. कोश्यारींचे निर्णय. कोश्यारींची कृती, ही कायमच नव्या वादांना तोंड फोडणारी आहे. महाविकास आघाडीच्या काळात सुरु झालेल्या या वादांची मालिका सरकार सत्तेतून गेल्यानंतरही सुरुच आहे.
Bhagat Singh Koshyari controversial statement : जेव्हा जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलले, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र वादाने ढवळून निघाला. कोश्यारींची विधानं. कोश्यारींचे निर्णय. कोश्यारींची कृती, ही कायमच नव्या वादांना तोंड फोडणारी आहे. महाविकास आघाडीच्या काळात सुरु झालेल्या या वादांची मालिका सरकार सत्तेतून गेल्यानंतरही सुरुच आहे. पण त्याची सुरुवात झाली ती महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच. पाहूयात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्य कोणती होती...
ठाकरे सरकारच्या शपथविधीवेळी काही मंत्र्यांनी शपथविधीतल्या मजकुरापेक्षा वेगळा मजकूर वाचला... आणि तिथेच भगतसिंह कोश्यारी भडकले... भर मंचावरुन कोश्यारींनी प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप केला... आणि अनेक मंत्र्यांचा शपथविधी मध्येच थांबवला.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य होणं अनिवार्य होतं. त्यासाठी राज्यपालांची मंजुरी आवश्यक होती. पण राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या अर्जाची फाईल प्रलंबित ठेवल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला. आणि वाद वाढल्यानंतर अखेरच्या क्षणी राज्यपाल कार्यालयाने या अर्जाला मंजुरी दिली.
कोरोनाचा काळ सुरु असताना तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. पण याच निर्णयामध्ये हस्तक्षेप करत कोश्यारींनी विद्यापीठ अनुदान आयोगाला विश्वासात का घेतले नाही, असा सवाल सरकारला विचारला... इतकंच नाही.. मंत्र्यांनी परीक्षांच्या वेळापत्रकात लुडबूड करुन नये असा सल्लाही दिला. आणि परीक्षा घेण्याची शिफारसही केली.
तुझे क्या लगता है उद्धव ठाकरे... आज मेरा घर टूटा है... कल तेरा घमंड टूटेगा असं अभिनेत्री कंगनानं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंगना कोश्यारींच्या भेटीला गेली होती. पण जेव्हा कंगना प्रकरणाने उचल खाल्ली, तेव्हा मात्र राज्यपाल कोश्यारी आणि ठाकरे हा वाद टिपेला पोहोचला... ज्या कंगनाने उद्धव ठाकरेंना अरे तुरे करत. ठाकरे कुटुंबाचे वाभाडे काढले होते. त्याच कंगनाला कोश्यारींनी भेटण्याची वेळ दिली. एकीकडे मुंबई महापालिकेनं कंगनाच्या ऑफिसचं बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करुन त्यावर बुल्डोझर चालवला होता. तीच कंगना ठाकरेंची तक्रार करण्यासाठी राज्यपालांच्या दालनात पोहोचली होती.
पण कोश्यारी आणि ठाकरे सरकार वाद तेव्हा टीपेला पोहोचला. जेव्हा कोरोना काळामध्ये मंदिरं उघडण्याची मागणी कोश्यारींनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली. त्या पत्राची भाषा प्रचंड आक्रमक होती. कारण त्यात कोश्यारींनी ठाकरेंच्या हिंदुत्वावरच सवाल उपस्थित केले होते. कोश्यारी उद्धव ठाकरेंना म्हणाले की, सरकारने एका बाजूला बार, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, समुद्रकिनारे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूस सरकारने मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे अद्याप बंद ठेवली आहेत. हा विरोधाभास आहे. तुम्ही स्वत: हिंदुत्ववादी आहात. तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार वाटतो. मात्र आता तुम्हीच धर्मनिरपेक्ष झालात का, असा प्रश्न विचारला.
राज्यपालांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनीही तितकंच चोख उत्तर दिलं होतं... ते म्हणाले की, 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे ‘सेक्युलर’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभाच ‘सेक्युलर’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का?'
ठाकरे विरुद्ध कोश्यारी हा वाद वैयक्तिक पातळीवर तेव्हा पोहोचला... जेव्हा मसुरीला जाण्यासाठी राज्यपालांनी शासकीय विमानाचं बुकिंग केलं होतं. कोश्यारी विमानात जाऊन बसलेही... पण तेव्हा त्यांच्या विमानाचं बुकिंग झालं नसल्याची माहिती देऊन, त्यांना विमानातून उतरवलं गेल्याचा आरोप झाला.
पण कोश्यारींचा खरा वाद रंगला... तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल कोश्यारींनी केलेल्या खालच्या पातळीवरच्या वक्तव्यावरुन. पुण्यात 14 फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना कोश्यारींनी वादग्रस्त विधान केलं होतं.
या विधानाला दोन आठवडे पूर्ण होण्याच्या आतच... कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही एक विधान केलं. त्यात त्यांनी समर्थ रामदासांविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारलं असतं... असं विधान केलं. आणि महाराष्ट्रात एकच वाद उफाळला.
त्यामुळे कोश्यारी जेव्हापासून महाराष्ट्रात आले आहेत. तेव्हापासून वादाची लडी लागलेली आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्या पदावरची व्यक्ती कायम वादात राहणं. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.