(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambedkar Jayanti 2023: बाबासाहेबांचा पुतळा कोरियामध्ये बनवणार, हाती घड्याळही बांधणार; 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' मध्ये तिसऱ्यांदा बदल
Ambedkar Jayanti 2023: जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो-लाखोंच्या संख्येने पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र या पुतळ्यापैकी सर्वाधिक उंचीचा पुतळा दादरच्या इंदू मिलमधील स्मारकात असणार आहे.
मुंबई : दादरच्या इंदू मिलच्या सुमारे 12 एकर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar) यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात उभारण्यात येणाऱ्या 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हाती आता घड्याळ बांधले जाणार आहे. पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी 14 तज्ज्ञांच्या समितीने गाझियाबादला (दिल्ली) नुकतीच भेट दिली, तेव्हा समितीने ही सूचना केली. तसेच हा पुतळा आता चीनऐवजी दक्षिण कोरियात बनवण्याचा कंपनीचा विचार आहे.
जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो-लाखोंच्या संख्येने पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र या पुतळ्यापैकी सर्वाधिक उंचीचा पुतळा दादरच्या इंदू मिलमधील स्मारकात असणार आहे. साडे तीनशे फूट उंचीचा हा पुतळा आणि शंभर फुटांच्या चबुतऱ्यावर उभा केला जाणार आहे. एकूण साडेचारशे फूट उंचीचा हा पुतळा दिमाखात उभा असणार आहे. थोडक्यात 40 मजली इमारत जेवढी उंच असेल तेवढ्या उंचीचा हा पुतळा समुद्राच्या किनारी पाहायला मिळेल.
काय आहेत सूचना?
- बाबासाहेबांचा पुतळा पेडस्टलसह 450 फूट उंच आहे. ही उंची इमारतीच्या 40 मजले इतकी होईल. दादरमध्ये 40 मजल्यांची इमारत नाही. नागरी विमान उड्डयन मंत्रालयाने पुतळा यापेक्षा उंच करू नये, अशी सूचना केली.
- पुतळ्यापर्यंत चालत जाण्यासाठी रॅम्प असणार आहे. तसेच लिफ्टने जाण्यासाठी येथे पाच लिफ्टची सोय आहे.
- पुतळ्याचे तों अरबी समुद्राकडे असणार आहे. याच बाजूला चैत्यभूमी आहे. उजव्या हाताचे बोट हे सहा फूट लांबीचे आहे.
- शिल्पकार राम सुतार यांनी प्रस्तावित पुतळ्याची 25 फूट प्रतिकृती बनवली आहे. एमएमआरडीएने पुतळ्यात काही बदल सुचवले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भेट देण्यास गेलेल्या समितीने काही त्रुटी काढल्या होत्या. आता तिसऱ्यांदा 14 सदस्यांच्या समितीने सुतार यांचा स्टुडिओ असलेल्या शहादाबाद येथे जाऊन पाहणी केली.
- स्मारकाच्या मधोमध 100 फूट उंच सिमेंटचा पिलर असणार आहे. त्यावरती दहा- दहा फुटांचे पत्र्याचे तुकडे जोडून 350 फूट उंच पुतळा उभारला जाईल.
- पुतळ्याची 25 फूट बनवलेली प्रतिकृती फायबरची आहे. ती 350 फूट रूपांतरीत केली जाईल. ब्राँझचे 10 फूट तुकडे फाँड्रीत ओतले जातील.
- पुतळ्याच्या डाव्या हाती संविधान असून उजव्या हाताचे बोट उंचावलेले आहे. पण बाबासाहेब डाव्या हाती घड्याळ घालत असत. पण ते प्रतिकृतीत दिसले नाही. त्यामुळे समितीने घड्याळ बांधण्याची सूचना राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांना केली. पुतळ्याच्या अंतिम मान्यतेचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमिती घेणार आहे.
- आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे बाबासाहेबांचा 125 फूट उंच पुतळा बसवण्यात येत आहे. त्याचे काम राम सुतार यांच्या फौंड्रीत झाले. 350 फूट उंच पुतळा बनवण्याचीही त्यांची तयारी आहे.
- गाझियाबादेत 10 फूट ब्राँझचे पत्रे अडीच वर्षांत तयार होतील. ते मुंबईतील पुतळ्याला जोडले जातील, असे अनिल राम सुतार यांनी सांगितले.
इंदू मिलच्या सुमारे 12 एकर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणार असून संसदेच्या प्रतिकृतीप्रमाणेच दिसणार आहे. त्यामुळे इंदू मिल परिसरात अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरात असणार्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच पुतळा उभा राहणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :