(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : 'आभा' मध्ये दिसणार रुग्णांच्या आरोग्याची कुंडली; जुने 'प्रिस्क्रिप्शन' सांभाळण्याचे 'टेंशन' संपणार
'आभा'मध्ये आधार कार्ड प्रमाणेच रुग्णाला 14 अंकी युनिक क्रमांक मिळेल. हा नंबरच संबंधित व्यक्तीची ओळख असेल. पूर्वीच्या आजारांसह उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवलेली जाईल.
Nagpur News : रुग्णांना शासकीय रुग्णालयातून उपचार घेताना डॉक्टरांच्या चिठ्ठ्याही जपाव्या लागत होत्या. मात्र आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) GMC मध्ये सुरु झालेल्या 'आभा' ABHA (Ayushman Bharat Health Account) प्रणालीमुळे रुग्णांच्या आरोग्याची कुंडलीच केंद्रीय सर्व्हरवर (centralized server) सेव्ह असणार आहे. आधी काही आजार झाला होता का, कोणत्या टेस्ट केल्या, काय औषध घेतले, किती डोस घेतले यासह आदींची माहिती या प्रणालीद्वारे संग्रहीत असणार आहे. कधी जुनी चिठ्ठी दिसली नाही, तर ऐनवेळी धावाधाव करावी लागत होती. 'आभा'मुळे या समस्येतून आता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कायमची मुक्ती मिळाली आहे.
आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट अर्थात 'आभा' डिजिटल हेल्थ कार्डमुळे ही भानगड कायमची सुटणार आहे. 'आभा' डिजिटल हेल्थ कार्ड नोंदणीचा नुकताच मेडिकलमध्ये (Government Medical College and Hospital) शुभारंभ झाला. वैद्यकीय क्षेत्रातील हे नवे क्रांतीपर्व असल्याचे मानले जात आहे. हे कार्ड असलेला रुग्ण देशातील कोणत्याही रुग्णालयात गेल्यास उपचाराची 'हिस्ट्री' डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
काय आहे योजना?
देशात आयुष्यमान भारत डिजिटल मिशनअंतर्गत रुग्णांचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यास सुरुवात झाली आहे. अगदी आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येक रुग्णाला 14 अंकी युनिक क्रमांक मिळेल. हा नंबरच संबंधित व्यक्तीची ओळख असेल. कार्ड व क्रमांकावर पूर्वीच्या आजारांसह उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवलेली जाईल. पुढे ती सर्वांसाठीच उपलब्ध असेल. रुग्ण आरोग्य योजनेशी संलग्न असल्यास त्याचीही नोंद असेल. सध्या रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे जाताच वेगवेगळ्या चाचण्या करण्यास सांगितल्या जातात. यामुळे पैसा व वेळ दोन्ही वाया जातो. पण, या कार्डवर तपासण्यांबाबत माहिती असल्याने डॉक्टर तातडीने उपचार करू शकतील. महात्मा फुले जनआरोग्य अभियानाद्वारे ही नोंदणी करण्यात येत आहे. मेडिकलमध्ये कान नाक घसा विभाग प्रमुख तसेच उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहुरे यांच्या हस्ते नोंदणीला सुरूवात झाली. यावेळी महात्मा फुले जनआरोग्य विभागाचे समन्वयक डॉ. तारकेश्वर गोडघाटे उपस्थित होते.
अशी करा नोंदणी
- ndhm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.
- आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करता येईल.
- केवळ एक फोटो, जन्मतारीख, पत्ता पुरेसा आहे.
ही बातमी देखील वाचा