अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याने सोलापुरात वातावरण चिघळलं, माथाडी कामगार आक्रमक, कांदा लिलाव ठप्प
जरं माथाडी कामगारांनी कांदा उतरवला नाही तर उद्या कांद्याच्या लिलावावर परिणाम होऊ शकतात
Solapur: राज्यात सध्या परभणीत झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणाने वातावरण तापलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता सोलापूरात उमटले आहेत.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री माथाडी कामगारांनी आंदोलन पुकारलं. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज शेकडो गाडीत कांदा येतो. रात्री उशिरा हा कांदा बाजार समितीमध्ये उतरवल्यानंतर सकाळी कांदयाचे लिलाव पार पडतात. मात्र रात्री 12 वाजता माथाडी कामगारांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा विरोधात तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं. शेतकऱ्यांनी आणलेल्या कांदा उतरवणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा रात्रभर गाडीतच थांबून राहिला.
माथाडी कामगारांनी पुकारलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांची मोठा फौजफाटा बाजार समितीमध्ये दाखल झाला. यावेळी पोलिसांनी माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र हे सर्व माथाडी कामगार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले.
नक्की झाले काय?
सोलापूर बाजार समितीत दररोज शेकडो गाड्यांमधून कांदा येतो. रात्री उशिरा हा कांदा उतरवण्यात येतो, आणि सकाळी त्याचा लिलाव सुरू होतो. मात्र मंगळवारी मध्यरात्री माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन जाहीर केले. त्यांनी कांदा उतरण्यास नकार दिल्यामुळे गाड्यांमधील कांदा उतरवला गेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेला कांदा गाड्यांमध्येच अडकून राहिला.या आंदोलनामुळे कांदा लिलाव प्रक्रिया वेळेत होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. कामगारांनी सांगितले की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी आणि अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौजफाटा बाजार समितीत पाठवला. पोलिसांनी माथाडी कामगारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र कामगारांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय म्हणाले होते अमित शहा?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना आंबेडकरांचं नाव घेत एक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे. आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन सध्या झाली आहे असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं, त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अमित शाह काय म्हणाले?आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे सारख म्हणत राहणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. जर तुम्ही एवढ्यावेळा देवाचे नाव घेतला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती, असे शाहांनी म्हटलं आहे. यानंतर लगेचच शाह यांनी आंबेडकर यांचे शंभर वेळा नाव घ्या, पण मी तुम्हाला आंबेडकरांबद्दल खरे काय वाटते ते सांगेन असे शाह यांनी म्हटले.
संबंधित बातमी:.