अमित शाहांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलेली भेटीची वेळ अचानक रद्द, सीमा प्रश्नावर होणार होती चर्चा
Maharashtra Karnataka Border Dispute : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलेली भेटीची वेळ अचानक रद्द केलीय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर या भेटीत चर्चा होणार होती.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) खासदारांना दिलेली भेटीची वेळ अचानक रद्द केली आहे. गृहमंत्र्यांनी खासदारांना दिलेली वेळ अशी क्वचितच रद्द होते. त्यामुळे या रद्द झालेल्या भेटीमागे नेमकं काय कारण आहे? याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra Karnataka border dispute) शिंदे गटाचे खासदारही दोन दिवसांपासून अमित शाह यांना भेटणार असं म्हणत आहेत. परंतु, त्याआधीच महाविकास आघाडीच्या खासदारांना वेळ मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, महाविकास आघाडीच्या खासदारांना देण्यात आलेली वेळ आता अचानकच रद्द करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेट रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचं सीमावादावर एकत्रित पत्र
— Prashant Kadam (@_prashantkadam) December 8, 2022
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चिथावणीखोर वक्तव्य करण्यापासून रोखा
कायद्याचं पालन करणाऱ्या मराठी नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या कृत्यांना आळा घालण्याची मागणी pic.twitter.com/vLwTZEDT2i
सीमावादावर गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घालणार असल्याचे कालपर्यंत महाविकास आघाडीचे खासदार सांगत होते. परंतु, आता अचानकच ही वेळ रद्द झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नाजारी व्यक्त करण्यात येत आहे. "भेट का रद्द झाली माहित नाही. कदाचित शिंदे गटाच्या खासदारांना आधी भेटायचं असेल, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
Maharashtra Karnataka border dispute : भेट रद्द झाल्यानंतर अमित शाह यांना पत्र
गृहमंत्र्यांची ही भेट रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांनी एकत्रितपणे एक पत्र त्यांना पाठवलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चिथावणीखोर वक्तव्यं करण्यापासून रोखा. मराठी जनता कायद्याचं पालन करतेय, त्यांना दुखावणारी कृत्यं कर्नाटकच्या संघटना करत आहेत. त्यांना वेळीच आवर घाला अशी मागणी या पत्रात करण्यात आलीय.
Maharashtra Karnataka border dispute : न झालेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा
"गेल्या दोन दिवसांपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सीमावादाचे पडसाद उमटत आहेत. पहिल्याच दिवशी दोन राज्यातील खासदारांची बाचाबाची झाली. त्यानंतर आता एका न झालेल्या भेटीची चर्चा रंगली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील गावांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आलाय. बेळगावध्ये महाराष्ट्रातील सहा ट्रकवर दगडफेक देखील करण्यात आलीय. या दगडफेकीतनंतर सीमा भागातील वातावरण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे खासदार अमित शाह यांना भेटणार होते. सीमावादाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील खासदारांची सर्वपक्षीय एकी दिसायला हवी. परंतु,सध्या तरी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी शिंदे गट आणि महाविकास आघाडी असे दोन स्वतंत्र प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता गृहमंत्र्यांनी मविआच्या खासदारांना दिलेली वेळ रद्द केली. त्यामुळे आता अमित शाह यांची भेट प्रथम कोणाला मिळते हे ही पाहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या