आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही; एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदेंनी सांगितला व्हॅनमधील 45 मिनिटाचा थरार
अक्षय शिंदेचे रौद्र रुप व देहबोली पाहून तो त्याच्याकडील पिस्तुलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखत स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली.
ठाणे : बदलापूरमधील (Badlapur School Abusse) दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) सोमवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्यांच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने शिंदेचा मृत्यू झाला ते पोलिस निरीक्षक आहेत संजय शिंदे. या कारवाईमध्ये संजय शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे हेही जखमी झाले आहेत.अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेंच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाती पिस्तुल घेऊन कोणालाही सोडणार नाही अशी अक्षयने धमकी दिली. त्यानंतर हवालदार महेश तावडेंच्या दिशेने दोन राऊंड फायर केल्या. त्यामुळे आणखी गोळ्या झाडेल अशी खात्री पटल्याने पोलिसांनी गोळीबार केल्याचे संजय शिंदे म्हणाले. मुंब्रा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात विस्तृत उल्लेख केला आहे.
संजय शिंदे आपल्या जबाबात म्हणाले, सोमवारी सकाळी 5.30 च्या दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही ठाण्याचे दिशेने निघालो. या वेळी मी व्हॅनमध्ये पुढे बसलो होते. तर अक्षय आणि सपोनि निलेश मोरे आणि दोन अंमलदार अक्षयसोबत मागे बसले होते. शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असताना निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरुन फोन करुन आरोप अक्षय शिंदे हा, मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे?, असे रागाने बोलत असून शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने मागे येऊन बसलो. आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आलो असता सायंकाळी 6.15 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे हा अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्तुल बळाचा वापर करुन खेचू लागला. अक्षय पिस्तुल हिसकवण्याचा प्रयत्न करत असताना अक्षय शिंदे यास अडविण्याचा प्रयत्न केला.
हाती पिस्तुल घेऊन कोणालाही सोडणार नाही अशी अक्षयची धमकी : संजय शिंदे
पिस्तुल हिसकवताना सुरू असलेल्या झटापटीत आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या, असं म्हणत होता. झटापटीमध्ये सपोनि निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा सपोनि निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्तुलचा ताबा घेऊन "आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही" असे रागारागाने ओरडून आम्हाला बोलू लागाला, त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझे व हरिश तावडे यांच्या दिशेने त्याचे हातातील पिस्तूल रोखून आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत.
'आणखी गोळ्या झाडेल अशी खात्री पटल्याने पोलिसांचा गोळीबार' : संजय शिंदे
आरोपी अक्षय शिंदेचे रौद्र रुप व देहबोली पाहुन तो त्याच्याकडील पिस्तुलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखत स्वसंरक्षणार्थ माझ्याकडील पिस्तुलाने एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्तुलचा ताबा सुटला, त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवले आणि वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल, कळवा येथे आणून मी अक्षय शिंदे व निलेश मोरे औषधोपचारसाठी दाखल झाले. त्यानंतर निलेश मोरे व मला पुढील औषधोपचारसाठी ज्युपीटर हॉस्पीटलला येथे दाखल केले असून वैद्यकीय उपचार चालू आहेत. आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे मला नंतर समजले.
हे ही वाचा :
अक्षय शिंदेला मारण्यापूर्वी पोलिसांनीच त्याचा खिशात 'तो' कागद ठेवला; अक्षयच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप