पालकमंत्री बच्चू कडू यांच्या 'स्टींग ऑपरेशन'चा इम्पॅक्ट; एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन
पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यात केलेल्या 'स्टींग ऑपरेशन'नंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. मात्र, दोषी असलेल्या बड्या माशांवर कारवाई कधी? असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.
अकोला : 21 जूनला अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात अकोला आणि पातूर येथे एक 'स्टिंग ऑपरेशन' केलं होतं. या 'स्टिंग ऑपरेशन'मुळे जिल्ह्यातील पोलीस आणि अन्न-औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाची लक्तरं अक्षरश: वेशीवर टांगली गेलीत. पालकमंत्र्यांच्या या 'स्टिंग ऑपरेशन'नंतर आता कारवाईला सुरूवात झाली आहे. अकोल्याच्या प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई भास्कर इंगळे यांना निलंबित केलंय. पालकमंत्री बच्चू कडू यांनी पातूरमध्ये लाखो रूपयांचा गुटखा पकडला होता. मात्र, यातील 'बडे' मासे सोडून एका सामान्य शिपायाचं निलंबन म्हणजे 'चोर सोडून सन्याशाला फाशी' असा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.
अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागलेली आहे. या सोबतच जिल्ह्यात फक्त वसुली शाखा ठरलेल्या 'अन्न-औषध प्रशासन विभागा'त मोठ्या साफ-सफाईची गरज आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांना येथील भ्रष्ट प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी अकोल्यात केलेल्या एका स्टिंग ऑपरेशन'मुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी 'शेख अब्दुल रशीद' या नावाने मुस्लिम व्यक्तीसारखं वेषांतर करीत शासकीय व्यवस्थेला अक्षरश: उघडं पाडलं. वेषांतर केलेले पालकमंत्री त्या दिवशी अकोला आणि पातूर येथे दिवसभर फिरलेत. कधी एखाद्या रेशन दुकानात तर एखाद्या कृषी केंद्रात. कधी महापालिकेत, कधी पाणपट्टीवर तर कधी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये. अनेक ठिकाणी त्यांना दिसली ती फक्त खाबूगीरी. या दिवसभरातील ऑपरेशनमध्ये पातूरच्या विदर्भ-कोकण बँकेच्या मॅनेजरमधील 'देव' माणुसही त्यांना दिसला. तर पैशाचं आमिष नाकारणारे पातूर तहसीलमधील काही चांगले कर्मचारीही भेटले. संध्याकाळपर्यंत हे सारं 'स्टींग' चाललं. अन् जेव्हा यातील पालकमंत्री बच्चू कडू समोर आले तेव्हा यंत्रणेच्या पायाखालची जणू वाळूच सरकली. यानंतर आता कारवाई सुरू झाली आहे. मात्र, ही होत असलेली कारवाई फक्त वरवरची असल्याची भावना आता सर्वसान्यांच्या चर्चेत दिसत आहे.
असं झालं होतं 'स्टींग ऑपरेशन' :
बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांच्याकडे अनेक तक्रारी येतात. या तक्रारारींमध्ये सर्वाधिक तक्रारी असतात या अकोला महापालिका, पोलीस, अन्न-औषध प्रशासन विभाग, कृषी केंद्र आणि तहसील यांच्या संदर्भातील. मंत्री असल्याने सरकारी तामझाम, ताफा आणि मागे-पुढे फिरणारं प्रशासन यांच्यामुळे जिल्ह्यात सर्व काही 'आलबेल' असल्याचं चित्रं त्यांच्यापुढे उभं केलं जातं. मात्र, बच्चू कडू यांच्यातील कार्यकर्त्यानं यात किती 'सत्य' आहे हे शोधण्याचा निश्चय केला. अन् त्यातूनच पुढे आलं आजचं 'स्टींग ऑपरेशन'. यात प्रशासनाच्या दाव्यातलं खरं 'सत्य' त्यांच्यासमोर आलं. अन् जिल्हा प्रशासनातील अनेक विभागांची 'पोलखोल' झाली.
20 जूनला सकाळी आठ वाजता ते अमरावतीवरून अकोल्याकडे निघाले. त्यांनी आपला हा दौरा पूर्णपणे गुप्त ठेवला होता. त्यांच्या या दौऱ्याची ना प्रशासनाला भनक होती, ना पोलिसांना कोणती माहिती. त्यांनी दर्यापुरात मुस्लिम व्यक्तीचं वेषांतर केलं. अंगात पांढरी शुभ्र पठाणी. डोळ्यात सुरमा, डोक्यावर मुस्लिमांची गोल टोपी. अन् नाव धारण केलं शेख अब्दुल रशीद. या अब्दूलभाईंना कोणत्या ठिकाणी काय अनुभव आला. अन् यात 'खाबूगिरी'सोबतच काही चांगलं काम करणाऱ्या लोकांची ओळख झाली. या कारवाईत त्यांनी पातूरात लाखो रूपयांचा गुटखाही पकडला.
पोलिस कर्मचाऱ्यांनर कारवाई, 'बडे' अधिकारी मोकाट :
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कारवाईनंतर आता कारवाईला सुरूवात झाली आहे. अकोल्याच्या प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई भास्कर इंगळे यांना निलंबित केलं. पालकमंत्री बच्चू कडू यांनी पातूरमध्ये लाखो रूपयांचा गुटखा पकडला होता. यासोबतच कामात टाळाटाळ करणाऱ्या जुने शहर पोलीस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम हे या तीन कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत. मात्र, यातील 'बडे' मासे सोडून एका सामान्य शिपायाचं निलंबन म्हणजे 'चोर सोडून सन्याशाला फाशी' असा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे. अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय कसे चालू शकतात? असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. त्यामुळे जनसामान्यांत 'डॅशिंग नेता' अशी प्रतिमा असलेले पालकमंत्री बच्चू कडू हे अशा अधिकाऱ्यांनांही नक्कीच वठणीवर आणतील असा विश्वास सर्वसामान्यांना आहे.
बच्चूभाऊ! अन्न-औषध प्रशासन विभागात मोठ्या 'साफ-सफाई'ची गरज :
परवाच्या स्टिंग ऑपरेशन'मध्ये जिल्ह्यात गुटखाबंदी असताना तो किती सहज उपलब्ध होऊ शकतो, याचा प्रत्यय पालकमंत्र्यांना आला. गुटखा माफियांचे 'लाभार्थी' कोण याची इत्यंभूत माहिती या 'ऑपरेशन' निमित्ताने पालकमंत्र्यांना कळाली. अकोला हे विदर्भसह लगतच्या मध्यप्रदेशात गुटख्याचा काळाबाजार करणारं महत्वाचं केंद्र आहे. येथून महिन्याकाठी कोट्यवधींचा गुटखा ठिकठिकाणी पोहोचवला जातो. अन् हे सारं बिनबोभाटपणे सुरू आहे अन्न-औषध प्रशासन विभागाच्या आशिर्वादाने. अकोल्यातून हा सारा काळाबाजार होत असताना हा विभाग झोपण्यामागचा 'अर्थ' काय याचं उत्तर पालकमंत्र्यांना शोधावं लागणार आहे. कोरोना काळात रेमडेसीवीरचा मोठा काळाबाजर अकोल्यात झाला होता. जवळपास 22 लोकांना यात अटकही झाली होती. हे अपयश या विभागाचं नव्हतं का? जिल्ह्यात खुलेआमपणे गुटखा विकला जातो, हे पालकमंत्र्यांना दिसू शकतं. मग या विभागाच्या अधिकाऱ्यांना का नाही? याचं उत्तरही पालकमंत्र्यांना शोधावं लागणार आहे. या विभागात मोठ्या सफाई मोहिमेचं काम बच्चू कडू यांना हाती घ्यावं लागणार आहे.
अखेर महापालिका आयुक्त नरमल्यात :
पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्या दिवशी वेषांतर करून केलेल्या 'स्टींग ऑपरेशन'दरम्यान अकोला महापालिकेतही भेट दिली. त्यांनी भेटण्यासाठी महापालिका आयुक्त निमा अरोरा यांचं कार्यालय गाठलं. यावेळी आयुक्त कार्यालयात त्या उपस्थित नव्हत्या. यावेळी वेषांतर केलेल्या पालकमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आयुक्त फक्त दुपारी 3 ते 5 या वेळेतच भेटतात. यासाठी तुमचा संपूर्ण टॅक्स भरल्याची पावती सोबत हवी. या अफलातून अटीवर पालकमंत्री अक्षरश: अवाक झालेत. या 'ऑपरेशन'नंतर त्यांनी आयुक्त निमा अरोरा यांना आपल्या भाषेत 'समज' दिली. आता महापालिका आयुक्तांनी 'ते' जाचक नियम आणि अटी मागे घेत सर्वसामान्यांना भेटण्यासाठी वेळेची अट मागे घेतली.
बच्चूभाऊ! जिल्ह्यातील वाळू माफियांना आवरा :
गेल्या काही काळात जिल्ह्यात वाळू माफियांनी चांगलंच थैमान घातलं आहे. अकोला, बाळापूर आणि अकोट विभागात तर या माफियांनी प्रशासनाला अक्षरश: गुंडाळून ठेवले आहे. राजकीय वरदहस्तानं जिल्ह्यातील नदीपात्राची पार चाळणी होऊन गेली आहे. महसुल आणि पोलीस प्रशासनाच्या साथीने वाळूमाफियांनी जिल्ह्यात पर्यावरणाची पार ऐशीतैशी केली आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी या वाळूचोरी संदर्भात एखादं असंच 'ऑपरेशन' केलं तर मोठा भ्रष्टाचार समोर येऊ शकतो, अशी सर्वसामान्यांना आशा आहे.