कापुस उत्पादक शेतकऱ्यांंच्या 'अच्छे दिन'; अकोल्यात 'पांढऱ्या सोन्या'ला मिळाला सर्वोच्च भाव
अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाला काल प्रति क्विंटल 10 हजार 330 असा सर्वोच्च भाव मिळाला आहे
अकोला : अकोल्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या 'अच्छे दिन' आले आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाला काल प्रति क्विंटल 10 हजार 330 असा विक्रमी भाव मिळालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या पावसामुळे तसंच बोंडआळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला होता. अशा गंभीर परिस्थितही शेतकऱ्यांनी कापसाचं पीक वाढवलं. याच कष्टाचं फळ शेतकऱ्यांना मिळालंय. कापसाला मिळालेल्या विक्रमी भावामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.
अमरावती विभागातील अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आपला कापूस अकोटमध्ये विकायला आणत आहेत. त्यामुळे सध्या अकोटच्या बाजारपेठेत सध्या दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. त्यामुळे शेतकरी अकोटमध्ये कापूस विकायला प्राधान्य देत आहेत. अकोटमध्ये कापसाला मिळत असलेल्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधनाचं हसू आलं आहे. यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5775 तर लांब धाग्याला 6100 एव्हढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे 3500 ते 4000 हजार रूपये अधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. विशेष म्हणजे येथील कापसाची आता प्रति क्विंटल बारा हजार रूपयांकडे वाटचाल सुरू आहे.
अकोट बाजार समितीत कापसाला जास्त भाव मिळण्याची कारणं.
1) अकोटमध्ये जिनिंगचे तब्बल 20 युनिट आहे.
2) येथील जिनिंगला दररोज 15 हजार क्विंटल कापसाची आवश्यकता पडते.
3) वऱ्हाडातील कापसात रूईचे प्रमाण अधिक आणि सरकीची जाडी कमी. यामूळे बाजारात या कापसाला चांगलीच मागणी.
4) येथला कापूस पुढे बांग्लादेश आणि चिनमध्येही निर्यात होतो.
अकोट बाजार समितीत सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत कापसाचा लिलाव केला जातोय. कापूस विकल्यानंतर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून लगेच पावती अन् संबंधित रकमेचा धनादेश दिला जातोय. ही संपूर्ण प्रक्रिया बाजार समितीच्या पुढाकारानं होते. यामुळे शेतकरी विश्वासानं आपला कापूस अकोटच्या बाजार समितीत आणतो
'कापूस कोंड्याची गोष्ट' म्हणून कापसाच्या पिकाची गेल्या दोन दशकांत चांगलीच अप्रतिष्ठा झालीय. सरकारी धोरणं, योग्य बाजारभाव अन बाजारातील विक्री-लिलाव पद्धतीत पारदर्शकता आणली तर हे पांढरं सोनं पुन्हा चकाकू लागेल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :