पवारसाहेब आमचे दैवत, पण... ; निवडणुकीच्या तोडांवर अजित पवारांची मन की बात
येत्या 29 तारखेला ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये येतील असे आश्वासन अजितदादांनी दिले आहे.
सोलापूर : पवारसाहेब आमचे दैवतच आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलंय. ते सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यातल्या (Solapur Karmala) सभेत बोलत होते. आजवर शरद पवारांच्या (Sharad Pawar) सोबतच काम केलं. आता योग्य रस्त्यानं जातोय, त्यात काय चुकलं, असा सवालही त्यांनी केलाय. कुणाला दुखावलं नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करमाळा येथे जन सन्मान यात्रेसाठी आले असता अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, आम्ही कोणाला दुखावले नाही , आजवर पवार साहेबांच्या सोबतच काम केले. पवार साहेब आमचे दैवत आहेत . पण आता आम्ही योग्य रस्त्याने जात विकास कामे करीत असताना आमचे काय चुकले असा सवाल करीत चुकले तर आमचे कान धरा असे सांगितले . तसेच गुलाबी रंगाचे फेटे बांधून आलेल्या शेकडो भगिनींकडे पाहत, आता कशा तुम्ही रुबाबदार दिसत आहे अशा शब्दात कौतुक केले. याचा एक फोटो काढून नवऱ्याला दाखवा आणि इतके दिवस तू फेटा बांधायचा आम्ही बघायचं आता मी फेटा बांधला तुम्ही बघा कशी दिसते असे विचारण्यासाठी सांगितले .
29 तारखेला खात्यामध्ये 4500 रुपये येतील, अजित पवारांचे आश्वासन
फुले, शाहू, आंबेडकर हे जसे बारा बलुतेदार व 18 पगड जाती यांना सोबत घेऊन गेले तसेच आम्हाला जायचे आहे म्हणून महापुरुषांची नावे घेतो असे सांगत कोणावरही अन्याय झाल्यास राष्ट्रवादी त्याच्या पाठीशी असेल असे सांगितले. येत्या 29 तारखेला ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये येतील असे आश्वासन अजितदादांनी दिले. विरोधक सत्तेत असताना त्यांनी काय केले नाही आता बहिणींना देतोय ते पाहवत नाही त्यामुळे त्यांच्या मागे जाऊ नका असे आवाहन अजित पवारांनी मतदारांना केले.
कोणावर अत्याचार न करता कायद्याच्या चौकटीत बसवून न्याय देणार : अजित पवार
आपलं काम एकदम चोख असते. कारखाने चोख , आपली बँक एकदम चोख आहे .. आपल्याकडे काटा पण परफेक्ट असे सांगत दादाचा वादा हा पक्का असतो असे सांगितले . आजवर पाचवेळा उपमुख्यमंत्री होतो , आजवर एकही माईकालाल हे करू शकला नाही असे सांगितले. राज्य दिवाळखोरीकडे घेऊन जातोय अशी माझ्यावर टीका करणाऱ्यांवर मी कर्जबाजारी करणारा माणूस नाही उलट देशात पहिल्या नंबरवर नेणार असा टोला लगावला. सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा व धनगर आरक्षणावर बोलताना आम्ही कोणावर अत्याचार न करता कायद्याच्या चौकटीत बसवून न्याय देणार असे सांगितले.