Ajit Pawar : मार्ड डॉक्टरांच्या मागण्या मान्य, रविवारी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार: अजित पवार
Maharashtra Association of Resident Doctors : मार्ड डॉक्टरांच्या मागण्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याने त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
![Ajit Pawar : मार्ड डॉक्टरांच्या मागण्या मान्य, रविवारी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार: अजित पवार Ajit Pawar on Mard doctors protest cabinet will get approval to Demands on Sunday Maharashtra Association of Resident Doctors marathi news Ajit Pawar : मार्ड डॉक्टरांच्या मागण्या मान्य, रविवारी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार: अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/15/3caa2ceb05376b44d14ed79f69b898981707998705558490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मार्ड डॉक्टरांचे (Maharashtra Association of Resident Doctors) प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या 7 फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या (25 फेब्रुवारी) मंत्रिमंडळ बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याने मार्ड डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार
राज्य सरकार मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. तसेच वस्तुस्थितीची माहिती दिली. राज्यातील रुग्णसेवा सुरळीत रहावी, रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून, मार्डने त्यांचा संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्ड डॉक्टरांना केले आहे.
गेल्या 7 फेब्रुवारीला मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याचा निर्णय झाला होता. विद्यावेतन वाढीसंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले होते.
वसतीगृहांच्या दुरूस्तीची कामं तातडीने करा
सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी, असे निर्देश देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत. अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरु करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करावी. वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे. शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)