Ajit Pawar : छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचे मौन, कोणतीही प्रतिक्रिया नाही
Ajit Pawar : मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं भर सभेत म्हटलं, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सोलापूर : छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांनी नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिल्याचं एल्गार मेळाव्यात म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यास नकार दिला असल्याचं समोर आलं आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला या प्रश्नावर अजित पवारांनी तुर्तास तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवासांपूर्वी एबीपी माझाला सूत्रांकडून भुजबळांच्या राजीनामाच्या बातमी दिली होती. पण त्यावेळी भुजबळांनीच यावर बोलणं टाळलं होतं. पण आता जाहीर सभेमध्येच भुजबळांनी त्यांच्या राजीनाम्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.
मंत्रिपदाचा दिला राजीनामा
छगन भुजबळ यांच्याकडे सध्या अन्न नागरी पुरवठा हे खातं आहे. तसेच राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर भुजबळांनी अजित पवारांचा हात धरला. पण भुजबळांनी सध्या त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मी ओबीसी समाजासाठी गेली 35 वर्ष काम करतोय, त्यामुळे समाजासाठी मी राजीनामा देण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असं देखील छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलं. 35 वर्षापासून मी ओबीसीसाठी काम करतोय, त्यामुळे मंत्रीपदाच सोडा आमदारकीचं पण सोयर सुतक मला नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एबीपी माझाला दिली होती.
मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा
16 नोव्हेंबरला सकाळी साडेबारा वाजता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला. छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची 18 नोव्हेंबरला एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तिन्ही मंत्र्यांनी छगन भुजबळ यांना राजीनामा देऊ नये अशी विनंती केली. त्यांनी राजीनामा दिला तर हे मंत्रिमंडळासाठी योग्य ठरणार नाही, तसेच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये असे स्पष्ट म्हटलं. यावेळी छगन भुजबळ यांनी तिन्ही मंत्र्यांची राजीनामा माध्यमांमध्ये दिल्याचं सांगणार नसल्याचे कबूल केलं मात्र राजीनामा मागे घेतला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजूनही छगन भुजबळ यांचा राजीनामा आहे.