हिंदू साधू संतांनी काय भूमिका घ्यायची हे अमोल मिटकरी सारख्या बाजारू विचारवंतांनी सांगू नये; राम सातपुतेंचा पलटवार
अमोल मिटकरींनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता भाजपचे आमदार राम सातपुतेंनी अमोल मिटकरींवर घणाघाती टीका करत पलटवार केला आहे.
Ram Satpute सोलापूर : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. अशातच रामगिरी महाराज यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) चांगलेच आक्रमक झाले होते. अमोल मिटकरींनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता भाजपचे आमदार राम सातपुतेंनी (Ram Satpute) अमोल मिटकरींवर घणाघाती टीका करत पलटवार केला आहे.
हिंदू विचारांची,हिंदू साधू संतांची अमोल मिटकरींना कावीळ
मला माहित आहे अमोल मिटकरींना हिंदू विचारांची, हिंदू संस्कृतीची आणि हिंदू साधू संतांची कावीळ आहे. त्यामुळे ते नेहमी भगव्यावर टीका करत असतात. मात्र अमोल मिटकरींनी हे विसरू नये कि आपण महायुतीचा भाग आहोत. अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराजांवर खालच्या भाषेत टीका केलीय, याचा मी निषेध करतो. तसेच हिंदू साधू संतांनी काय भूमिका घ्यायची, हे अमोल मिटकरी सारख्या बाजारू विचारवंतांनी सांगू नये, अशी बोचरी टीका आमदार राम सातपुतेंनी केली आहे.
वादग्रस्त वक्तव्याबाबत काय म्हणाले रामगिरी महाराज?
वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता रामगिरी महाराज म्हणाले की, तेढ निर्माण होण्यासारखे मी काही बोललो नाही. दीड तासांचे प्रवचन होते. त्यातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे, असे मी बोललो. कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही. कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोणी देत असेल तर सहन करायचे नाही. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही, आम्ही शांतताप्रिय आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना हटवा, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईंची मागणी
रामगिरी महाराज यांना अटक झाली पाहिजे. उद्या कोणी उठलं आणि रामाच्याबद्दल बोललं तर चालेल का? असा सवाल माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला. ते म्हणाले, धर्माचा आदर करणारा आपला समाज आहे. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात, ही देशाची परंपरा आणि संस्कृती आहे. या लोकांना संस्कृती बदलायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हलवलं पाहिजे, असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कांही तरी डोकं चालवून काम कराव, असा घणाघात ही यावेळी हुसने दलवाई यांनी केला आहे.
हे ही वाचा