मोठी बातमी! आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी बारामती तालुक्यासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा समजला जात आहे.
Lok Sabha Election 2024 : आचारसंहिता जाहीर होण्यासाठी अवघ्या काही मिनटांचा कालावधी बाकी राहिला असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) होण्यापूर्वी बारामती तालुक्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर अवघ्या तीन दिवसात बारामती (Baramati) तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक (आरोग्य प्रशिक्षण केंद्र) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी 77 कोटी 79 लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा समजला जात आहे.
या आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी बांधकाम, पदनिर्मिती व यंत्रसामग्री खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे मौजे सोमेश्वरनगरसह बारामती तालुका आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विकास कामाचा धडाका पाहायला मिळत आहे. तर, अजीत पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात असतानाच, अजित पवारांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अवघ्या तीन दिवसा कार्यवाही पूर्ण
बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसा कार्यवाही पूर्ण करुन शंभर खाटांच्या आरोग्य पथकास (आरोग्य प्रशिक्षण केंद्रास) मान्यता देण्यात आली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेस अधिन राहून 77 कोटी 79 लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. आरोग्य केंद्राचे बांधकाम, पदनिर्मिती, यंत्रणा व साधनसामग्रीसंदर्भात प्रचलित नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय?
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे समजले जात आहे. अशात अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे बारामती दौरे देखील वाढले आहेत. तर, सुनेत्रा पवार देखील गावागावाचा दौरा करतांना दिसत आहे. दरम्यान, याच मतदारसंघातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी अजित पवारांनी हा विषय मार्गी लावला असल्याचे बोले जात आहे. तर, याचा फायदा अजित पवारांच्या पक्षाला होणार का? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
इतर महत्वाच्या बातम्या :