एक्स्प्लोर
Advertisement
लग्नाचा भपका टाळून नवदाम्पत्याकडून परीक्षार्थींना 3 लाखांची पुस्तकं
अमर आणि राणी कळमकर या अहमदनगरमधील नवदाम्पत्याने लग्नावर अनाठायी खर्च टाळून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन लाखांची पुस्तकं भेट दिली
अहमदनगर : हल्ली लग्नात संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करण्याचा ट्रेंड आला आहे. डीजेच्या तालावर बेधुंद नाचत लग्नात पैसे उधळले जातात. मात्र अहमदनगरमध्ये नवदाम्पत्यानं डामडौल बाजूला ठेऊन नवा आदर्श घातला. लग्नाचा अनाठायी खर्च टाळून स्पर्धा परीक्षार्थींसाठी तब्बल तीन लाख रुपयांची पुस्तकं खरेदी केली आहेत.
या विवाह सोहळ्यात लक्ष्मीबरोबरच सरस्वतीचाही अनोखा संगम पहायला मिळाला. आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी ही नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देऊन कौतुक केलं.
अमर आणि राणी कळमकर या नवदाम्पत्याच्या लग्नाच्या रुखवतात पुस्तकं मांडली होती. 'फौजदार व्हायचंय... एमपीएससी पूर्व परीक्षा... एमपीएससी प्रश्नसंच.... इंडियन पॉलिटिक्स... भारतीय अर्थशास्त्र... फौजदार यशोमार्ग आणि जनरल नॉलेज... ' पैशांअभावी शैक्षणिक अडचणी आल्यामुळे इतरांसाठी त्यांनी ही पुस्तकं खरेदी केली. स्पर्धा परीक्षार्थींसाठी त्यांनी दहा हजार पुस्तकांचं वाचनालय सुरु केलं.
अमर आणि राणी दोघंही उच्चशिक्षित असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक आहे. दोघांनाही सामाजिक कार्याची आवड आहे. त्यामुळे दोघांनीही लग्नातील फेटे, हारतुरे, मानपान आणि सत्काराला फाटा दिला. आहेराऐवजी पुस्तकं आणण्याचं आवाहन त्यांनी पाहुण्यांना केलं. त्यामुळे लाडू, करंजीच्या रुखवताऐवजी सगळीकडे पुस्तकचं पुस्तकं दिसतात. लवकरच ही पुस्तकं लायब्ररीत दाखल होतील.
लग्न सोहळ्यात डीजेचा दणदणाट आणि फटाक्यांची आतषबाजी नसली, तरी कोणाचा रुसवाफुगवा नव्हता. अक्षतांऐवजी पुष्पवृष्टी झाली. या लग्नसोहळ्याला अनेक प्रतिष्ठितांनी हजेरी लावून नवदाम्पत्याचं कौतुक केलं.
कळमकर नव दाम्पत्य रेशीमगाठीच्या पवित्र धाग्यानं विवाहबद्ध झालं. आपला आनंद द्विगुणित करताना त्यांनी सामाजिक भानही जपलं. राणीच्या रुपाने अमरच्या आयुष्यात लक्ष्मी आली, मात्र दोघांनी मिळून गरजूंना सरस्वती भेट दिली. दोघांची ही पुस्तकांची भेट अजरामर राहील हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement