(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट वाढला, 4 मंत्र्यांच्या जिल्ह्यात कडक निर्बंधाची गरज
राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावला जातोय. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असतानाही कोणतीच नवीन उपाययोजना होताना दिसत नाहीय.
अहमदनगर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 80 हजार उच्चांकी कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मे महिन्यात सुद्धा कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पॉझिटिव्ह रेट 40 टक्यापर्यंत जाऊन पोहचल्यानंतर जिल्ह्यातील 4 मंत्री आता लक्ष घालत कडक निर्बंध लावणार का? याकडं सर्वांच लक्ष लागले आहे.
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरचे नाव समोर येत आहे. या जिल्ह्यात पालकमंत्रीसह 4 दिग्गज मंत्री आहेत. मात्र, कोरोना काळात या जिल्ह्यातील परिस्थिती बिकट बनली असून एप्रिल महिन्यात 80 हजार नवे कोरोना बाधित आढळले तर महिनाभरात 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन काळातही कोरोनाचा आलेख वाढत असून मे महिन्यात पॉझिटिव्ह रेट 40 टक्क्यांपर्यंत जाऊनही 4 मंत्री अद्याप कठोर निर्णय घेत नसल्यानं विरोधकांनी सवाल उपस्थित केलाय.
कोरोना बाधितांच्या टक्केवारीत अहमदनगर जिल्ह्याने राज्याला मागे टाकले असून राज्याचा पॉझिटिव्ह रेट 17 टक्के असेल तर आज अहमदनगर जिल्हा मात्र 50 टक्केपर्यंत जाऊन पोहचला आहे. तर मृत्युदर एप्रिल महिन्यात वाढला आहे. लॉकडाऊन असताना कोरोना आटोक्यात येण्याऐवजी वाढत असून कडक उपाय योजना करण्याची मागणी नागरिक करत आहे तर 4 मंत्र्यांनी केवळ बैठकी न घेता जिल्ह्यात तळ ठोकून बसण्याची गरज असल्याची मागणी केलीय.
राज्यात कडक लॉकडाऊनचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले ते केवळ कोरोना साखळी तोडण्यासाठी. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात साखळी तुटण्याऐवजी वाढतच जात असल्याचं आता आकडेवारीतून समोर येत आहे. एप्रिल महिन्यात 80 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून मे महिन्यात सुद्धा 1 मे पासून 8 मे पर्यंत (8 दिवसात) 30947 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. यामुळेच पॉझिटिव्ह रेट 26 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचलाय. सकाळी 7 ते 11 च्या काळात दिलेल्या सुटीमुळे नागरिक मोठी गर्दी करत असल्याच वारंवार समोर येतंय. एक तर कडक लॉकडाऊन लावावा, अशी मागणी आता नागरिकच करताना दिसत आहे.
मागील एप्रिल महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात 80 हजार पेक्षा जास्त कोरोनाबधित आढळले असून आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण आला आहे. नागरिक अजून ही काळजी घेत नसून लॉकडाऊन असला तरी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहे. यामुळेच कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत असल्याचं डॉ. प्रमोद म्हस्के यांनी सांगितलं आहे.
आज जिल्ह्यात 29 हजारपेक्षा जास्त रुग्ण सक्रीय असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. भविष्यातील धोका ओळखून आता डेडीकेटेड कोव्हिड सेंटर निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी ऑक्सिजन बेड असलेले कोव्हिडं सेंटर निर्माण होत आहेत.
चार मंत्री असून कोरोना रोखण्यात अपयश : विखे-पाटील
जिल्ह्यात चार मंत्री असताना त्यांना आपल्या स्वतःच्या तालुक्यात प्रादुर्भाव रोखण्यात अपयश येतंय. मंत्र्यांनी तालुक्याचे दौरे करण्यापेक्षा आता जिल्हा मुख्यालयात तळ ठोकून बसण्याची गरज असल्याची मागणी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीय. पुढील 15 दिवस आरोग्य सेवा वगळता कडक लॉकडाऊन करण्याची मागणी त्यांनी केलीय. सरकार निर्णय घेत नसेल तर जनतेने निर्णय घ्यावा अन्यथा सरकारच्या नादात आपल्याला मृत्यूला कवटाळण्याशिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य केले आहे.
आरोप करणं आणि राजकारणाला उत्तर देण्याची ही वेळ नसून आढावा बैठक घेऊन नियोजन करावच लागतं. मात्र, सध्या जे काही रुग्ण वाढताय याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत बोलून काय करता येईल याबाबत निर्णय घेऊ, अस वक्तव्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय.
जिल्ह्यातील आकडेवारी
एप्रिल महिन्यात 80 हजार 118 नवे कोरोना बाधित
एप्रिल महिन्यात 771 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू
कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट 25 टक्क्यांपर्यंत
1 मे ते 14 मे पर्यंतची एकूण आकडेवारी - 53673 नवीन कोरोना बाधीत (14 दिवसात)
आजपर्यंत एकूण कोरोनाबधित - 225609
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 200250
एकूण मृत्यू - 2430 (यात एप्रिल महिन्यात 771 सर्वाधिक)
जिल्ह्यातील 4 मंत्री
हसन मुश्रीफ - कोल्हापूर (पालकमंत्री)
बाळासाहेब थोरात - संगमनेर (महसूलमंत्री)
शंकरराव गडाख - नेवासा (जलसंधारण मंत्री)
प्राजक्त तनपुरे - राहुरी (राज्यमंत्री)
राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावला जातोय. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना जिह्यातील 4 मंत्री निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.