शेतकरी बांधवांनो वर्षाखेरीस शेतमालाचे भाव काय असणार? हमीभाव तरी मिळणार का? कृषी विभागाने सांगितलं...
सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना मागील वर्षभरापासून सोयाबीनला हमीभावही न मिळाल्याचे चित्र होते.
Agriculture: राज्यातील शेतमालांच्या हमीभावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना मागील वर्षापासून सोयाबीनसह कापूस मका आणि हरभऱ्याचेही भाव हमीभावापेक्षा कमी असल्याचे दिसून आल्यानंतर आता वर्षाखेरपर्यंत शेतमालांचा भाव काय असणार? आगामी दोन-तीन महिन्यात तरी शेतमालाला हमीभाव मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दरम्यान कृषी विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत शेतमालाच्या संभाव्य किमती काय असणार? हे सांगितलंय.
कोणत्या पिकाला किती हमीभाव?
कापूस मध्यम धाग्यासाठी सरकारनं मागील वर्षीच्या तुलनेत ५०१ रुपयांची वाढ केली असून कापसाला २०२४-२५ वर्षासाठी ७१२१ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. तर कापूस लांब धाग्यासाठी ७५२१ प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे. सोयाबीनच्या हमीभावात २९२ रुपयांची वाढ करून ४८९२ रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर करण्यात आला आहे. २०२४ वर्षासाठी तूरीला प्रतिक्विंटल ७५५० रुपये, मुग ८६८२ रुपये,उडीद ७४०० रुपये, मका २२२५ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पण अंदाजानुसार किती भाव मिळण्याची शक्यता आहे पहा..
मका उत्पादन घटलं, काय असतील क्विंटल मागे किमती?
जगातील मका उत्पादनाच्या तुलनेत 2024 25 वर्षात मक्याच्या उत्पादनात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 12281 लाख टन मका उत्पादन असताना यंदा बारा हजार दोनशे पाच लाख टन एवढेच मका उत्पादन झाल्याचे कृषी विभागांने सांगितले. कृषी विभागानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत मक्याचे बाजार भाव 2000 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढे राहण्याची शक्यता आहे.
तूर दहा ते बारा हजार प्रतिक्विंटल राहणार
मागील वर्षाच्या तुलनेत तुरीच्या उत्पादनात एक टक्क्याने घट झाल्याचे दिसून आल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तुरीचा भाव दहा ते बारा हजार पर्यंत राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने ही शक्यता वर्तवली आहे.
हरभऱ्याला काय भाव मिळणार?
Faq ग्रेड हरभऱ्याला ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सहा हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. भारतात मागील चार वर्षांपासून हरभऱ्याच्या उत्पादनात चढ उतार दिसत असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात हरभऱ्याचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीनला काय मिळणार भाव?
सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना मागील वर्षभरापासून सोयाबीनला हमीभावही न मिळाल्याचे चित्र होते. सरासरी होऊन कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीपातील सोयाबीन पीक धोक्यात आले होते परिणामी उत्पादनही घटले. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन उत्पादनात आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सोयाबीनला 4300 ते 5000 रुपये प्रति क्विंटल असण्याची शक्यता आहे.
कापसाला अंदाजे भाव एवढा
2023 मध्ये मागील पाच वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी कापसाचे उत्पादन झाल्याचे दिसून आलं. 295 लक्ष गाठी एवढेच उत्पादन मागील वर्षी झालं होतं. भारतात चालू वर्षात कापसाचे उत्पादन वाढल्याचे कृषी विभागांनं सांगितलंय. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कापसाचे अंदाजे किंमत 7000 ते 8000 रुपये प्रति क्विंटल असेल असा अंदाज कृषी विभागाने दिला आहे.