हाता तोंडाशी आलेला घास पुरानं हिसकावला, ऊसासह केळी जमिनदोस्त, शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान
राज्याच्या विविध भागात सद्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Agriculture News Solapur : राज्याच्या विविध भागात सद्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. नदी नाले दूथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती झाली आहे. तर काही ठिकाणी पूर आले आहेत. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्याला देखील पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळं ऊस शेतीसह केळी, सोयाबीन, भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उभी पिकं आडवी झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. माढा तालुक्यातील केवडमधील शंकर भगवान लटके या शेतकऱ्याला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. त्यांचे केळी आणि उसाचे पिक पूर्णत: पाण्यात आहे. त्यांचे तब्बल 25 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

हाता तोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यानं हिसकावला
माढा तालुक्यातील सीना नदीला पूर आला आहे. सीना कोळेगाव धरणाचे मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळं नदीला पूर आल्.यानं पुराचं पाणी शेतात शिरलं आहे. शंकर लटके यांची तीन एकर केळीचा बाग आहे. या सर्व बागेत पुराचं पाणी शिरलं आहे. तसेच दोन एकरवर उसाचं क्षेत्र आहे. ते देखील पाण्यात आहे. हाता तोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यानं हिसकावल्याची भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. ऊसही गेला आणि केळीही गेली, आता करायचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एकूण 25 लाख रुपयांचे नुकसान
तीन एकर केळीच्या पिकासाठी आत्तापर्यंत शंकर लटके यांनी साधारणत: पाच लाख रुपयांचा खर्च केला आहे. पुढच्या महिना ते दीड महिन्यात केळीची तोडणी होणार होती. मात्र, त्याआधीच पुराच्या पाण्यानं होत्याचं नव्हतं केलं आहे. प्रति एकरी 30 टन केळीचे उत्पादन अपेक्षीत होते. 25 ते 27 रुपये किलोप्रमाणे केळीला दर मिळाला तर मला या शेतीतून 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षीत होते असे संकर लटके म्हणाले. मात्र, आता यातून काही फायदा होईल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. ऊसाचे दोन एकर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. यातून पाच लाख रुपयांचे उत्पन येणे अपेक्षीत होते. मात्र, पूराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यामुळं ऊस पूर्ण आडवा झाला आहे. सध्या उसात तीन ते चार फूट पाणी साचल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. एकूण 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शंकर लटके यांनी एबीपी माझाला दिली आहे.

प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी
दरम्यान, हे फक्त एका शेतकऱ्याचे झालेले नुकसान आहे. असे नुकसान नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे झाले आहे. ऊसासह केळी, सोयाबीन पिक पाण्यात आहे. अनेकांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळं प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळगाव धरणात ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते त्यावेळी सीना नदीत पाणी सोडलं जातं. पण ज्यावेळी उन्हाळ्यात साधारणत: मे महिन्यात सीना नदी काठच्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते त्यावेळी मात्र पाणी सोडलं जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सीना कोळेगाव धरण प्रशासनाने पाण्याचे एक आवर्तन सीना नदीत सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:























