शेतकऱ्यांना बोगस खते, बियाणे दिल्यास दुकानदारांबरोबर कंपनीचा मालकही जाणार जेलमध्ये ; कृषीमंत्र्यांचा इशारा
शेतकऱ्यांना बोगस बियाणे, रासायनिक खते दिल्यास त्या दुकानदाराबरोबर कंपनीच्या मालकाविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhushe) यांनी दिली.

Dada Bhushe : बोगस खते आणि बियाने देवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु, यापुढे अशा गोष्टींना आळा बसणार आहे. कारण यापुढे शेतकऱ्यांना बोगस खते आणि बियाणे देणाऱ्या दुकानदाराबरोबर कंपनीचा मालक देखील जेलमध्ये जाणार आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दालनात वसई विरार पालिका क्षेत्रातील विकास कामांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत कृषीमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार राजेंद्र गावीत, आमदार रविंद्र फाटक उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बियाणे, रासायनिक खतांची कमतरता भासणार नसल्याचे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिलं. याबरोबरच बोगस बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांना दिल्यास त्या दुकानदाराबरोबर कंपनीच्या मालकाविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.
दादा भुसे यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही कडाडून टीका केली. "सध्या जे सुरू आहे ते सर्व स्टंटबाजी आहे. महाराष्ट्राची जनता या सर्व गोष्टींना वैतागलेली आहे. सर्वांसमोर सध्या बेरोजगारी, महागाई सारखे अनेक प्रश्न असताना नको ते प्रश्न उकरुन काढून समाजातील शांतता काही लोक बिघडवत आहेत, असा आरोप दादा भुसे यांनी यावेळी केला.
वसई विरार महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गुंडाळला
शनिवारी वसई विरार पालिका क्षेत्रातील विकास कामांची आढावा बैठक पालिकेच्या दालनात घेण्यात आली. यावेळी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या विकास कामांविषयी तसेच पालिकेच्या इतर विषयांवरही चर्चा झाली. या आढावा बैठकीत एका मिनिटातच वसई विरार महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गुंडाळण्यात आला. यावेळी पालघरच्या पालकमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामाचा विषय गहण असल्याचं सांगत, आता अनधिकृत बांधकाम तोडण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या























