(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी: केंद्रानंतर आता राज्य सरकारचाही सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात
Maharashtra Petrol Diesel Price : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकरनेही सर्वसामान्याना दिलासा दिला आहे.
Maharashtra Reduced VAT: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. केंद्राने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते, त्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला, असं बोललं जात आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
केंद्र-राज्याचे मिळून पेट्रोल-डिझेलच्या दरात इतक्या रुपयांची झाली कपात
केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.
राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर किती?
व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. याशिवाय सरकारने डिझेलवर 1 रुपये 44 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.
केरळने कमी केला व्हॅट
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील दरात कपात केल्यानंतर केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. शनिवारी केरळने पेट्रोल आणि डिझेलवरील राज्य कर अनुक्रमे 2.41 रुपये आणि 1.36 रुपये प्रति लिटरने कमी करण्याची घोषणा केली.
राजस्थान आणि ओडिशामध्येही इंधन स्वस्त झाले
दरम्यान, राजस्थान सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.48 रुपयांनी आणि डिझेलवरील 1.16 रुपयांनी कमी केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, “केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यामुळे राज्य सरकार पेट्रोलवरील व्हॅट 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपये प्रति लिटरने कमी करत आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल 10.48 रुपयांनी आणि डिझेल 7.16 रुपयांनी स्वस्त होणार आहे. याशिवाय, ओडिशा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर अनुक्रमे 2.23 रुपये आणि 1.36 रुपये प्रति लिटरने कमी केले आहे. या कपातीनंतर ओडिशात पेट्रोलची नवीन किंमत 102.25 रुपये आणि डिझेल 94.86 रुपये प्रति लिटर आहे.