Sanjay Raut : काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीच्या निशाण्यावर संजय राऊत!
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्यावर 'रोखठोक' टीका केली आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यूपीए नेतृत्वाबद्दल वक्तव्य करुन काँग्रेस नेत्यांकडून निशाण्यावर असलेल्या राऊतांवर आता दुसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निशाणा साधला आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावरुन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्यावर 'रोखठोक' टीका केली आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य महत्वाच्या नेत्यांनी संजय राऊतांच्या या मतावर टीका केली आहे. यूपीए नेतृत्वाबद्दल वक्तव्य करुन काँग्रेस नेत्यांकडून निशाण्यावर असलेल्या राऊतांवर आता दुसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निशाणा साधला आहे.
कुणीही मिठाचा खडा टाकू नये- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करते आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचे, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये असलेल्या कुणीही त्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे सर्वोच्च नेते आहेत. ते पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या पक्षातील कोणत्या नेत्यास मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तोच प्रकार काँग्रेसमध्ये देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणाला मंत्री करायचे हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. यापूर्वी देखील काँग्रेसमध्ये असताना पवार साहेबांनी सुधाकरराव नाईक असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या देताना भूमिका पार पाडली होती. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू असताना कुणी यामध्ये मिठाचा खडा टाकू नये असे पवार म्हणाले.
यूपीएचं नेतृत्व कुणाकडे? संजय राऊतांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार तर भाजपकडून खोचक प्रतिक्रिया
संजय राऊतांची भूमिका शिवसेनेची असते असं नाही - जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पत्रकार हे लिहित असतात. कौतुक करतात तर कधी टीकाही करतात. संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते नेहमी विविध पद्धतीनं लिहीत असतात. त्यात रोखठोकमध्ये असं लिहिलं आहे की, डॅमेज कंट्रोलसाठी नियोजन नाही. मग महाविकास आघाडीचे नेते कोण? उद्धव ठाकरे हेच आहेत ना? असा सवाल आव्हाडांनी केला. संजय राऊत जी भूमिका मांडतात ती शिवसेनेची असते असं नाही, सोनू सूदबद्दल मांडलेल्या भूमिकेचं काय झालं? असंही ते म्हणाले.
टीका झाली तर त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे- नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, या रोखठोक मध्ये जे काही विषय मांडण्यात आले त्यातील काही विषयाला आम्ही मान्य करतो. पण सर्वच त्या पद्धतीने झालं असं नाही. अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झालेले नाहीत. 25 वर्ष 5 टर्म ते आमदार होते तर 18 वर्ष मंत्री होते. अनुभवी माणूस अपघाताने गृहमंत्री होऊ शकत नाही. अनिल देशमुखांकडून काही चुका या मंत्री म्हणून झाल्यात. गृहमंत्र्यांनी काही मर्यादित विषय लोकांच्या समोर ठेवले पाहिजे. लोकमतच्या कार्यक्रम जे विषय मांडले ते टाळता आले असते. एक कनिष्ठ अधिकारी ज्या प्रकारे वागत होते. त्यात ते कुठेतरी दरारा निर्माण करण्यात कमी पडले असतील. जर एखादा अग्रलेख गृहमंत्री यांच्या कमी दाखवत असतील तर त्याला सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले. टीका झाली तर त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे, पुढे चांगले काम केले पाहिजे. आम्ही सकारात्मक पद्धतीने सामनातील लेखाला पाहतो. वाझे आणि परामबीर सिंग असं करत होते हे जर गृहमंत्री यांना माहीत असतं तर त्यांनी कधीच याला परावनगी दिली नसती, असं ते म्हणाले.
Sanjay Raut | शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग
संजय राऊत यांनी काय लिहिलं
संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. राऊतांनी म्हटलं आहे की, या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.
यूपीए अध्यक्षपदाच्या वक्तव्यावरुन राऊत काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर
याआधी संजय राऊतांवर काँग्रेस नेत्यांनी टीका केली होती. यूपीए अध्यक्षपदावरुन राऊत काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. संजय राऊत म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. यूपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ यूपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. तसंच यूपीए विकलांग झाली आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते.
यूपीएची चिंता संजय राऊतांनी करु नये, काँग्रेस नेत्यांची टीका
शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला होता. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल विचारत, शिवसेना ही यूपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनिया गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. यूपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये, असेही पटोले यावेळी म्हणाले. तर यूपीएबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं काँग्रेस ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई म्हणाले होते. अशी हास्यास्पद वक्तव्य करण्याची संजय राऊतांना सवय आहे. ते अशी वक्तव्यं करतात आणि गोत्यात येतात. मुळात शिवसेना अजून यूपीएमध्ये नाही. त्यामुळं यूपीएत नसताना त्याचं प्रमुख कोण होणार याची चर्चा करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. शरद पवार देखील असं बोलणार नाहीत. यूपीए काँग्रेसच्या नेतृत्वात झाली. यूपीएमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादी हा प्रादेशिक आणि मर्यादित पक्ष आहे. आता थोड्या जागा जास्त मिळाल्या म्हणून यूपीएचं अध्यक्षपद त्यांना द्यावं असं होत नाही, असं दलवाई म्हणाले होते.