यूपीएचं नेतृत्व कुणाकडे? संजय राऊतांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार तर भाजपकडून खोचक प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्याकडून यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची मागणी सातत्यानं पुढे आणत आहेत. आज राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या गोटातून जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत तर भाजपकडून मात्र यावर खोचक प्रतिक्रिया आल्या आहेत.
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी काँग्रेस उत्सुक असताना दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडून यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची मागणी सातत्यानं पुढे आणत आहेत. आज राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या गोटातून देखील जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत तर भाजपकडून मात्र यावर खोचक प्रतिक्रिया आल्या आहेत. यूपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये, तसंच यूपीएत नसताना यूपीएच्या नेतृत्वावर चर्चा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत तर संजय राऊत शिवसेनेचे खासदार आणि यूपीएचं नेतृत्व करत आलीय काँग्रेस. अशा अजब त्रिकोणात संजय राऊत मात्र सातत्यानं याबाबत वक्तव्य करत आहेत. आज त्यांच्या मागणीला संदर्भ होता सोनिया गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यात झालेली फोनवरुन चर्चा. आज संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. यूपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ यूपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. तसंच यूपीए विकलांग झाली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut | शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग
यूपीएची चिंता संजय राऊतांनी करु नये- पटोले
शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल विचारत, शिवसेना ही यूपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनिया गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. यूपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये, असेही पटोले यावेळी म्हणाले.
राऊत यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद- हुसैन दलवाई
यूपीएबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं काँग्रेस ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई म्हणाले. अशी हास्यास्पद वक्तव्य करण्याची संजय राऊतांना सवय आहे. ते अशी वक्तव्यं करतात आणि गोत्यात येतात. मुळात शिवसेना अजून यूपीएमध्ये नाही. त्यामुळं यूपीएत नसताना त्याचं प्रमुख कोण होणार याची चर्चा करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. शरद पवार देखील असं बोलणार नाहीत. यूपीए काँग्रेसच्या नेतृत्वात झाली. यूपीएमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादी हा प्रादेशिक आणि मर्यादित पक्ष आहे. आता थोड्या जागा जास्त मिळाल्या म्हणून यूपीएचं अध्यक्षपद त्यांना द्यावं असं होत नाही, असं दलवाई म्हणाले.
भाजपकडून खोचक प्रतिक्रिया
या विषयावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कॅप्टन बदलावर 16 वा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसते, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते याअर्थी केल्याचं दिसून येत आहे. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि संजय राऊत काहीही बोलत नाहीत, मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने करत आहेत, अशा शब्दांमध्ये दरेकर यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राऊतांच्या वक्तव्यांमुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?
यूपीए आणि एनडीए या दोन आघाड्या देशात एकेकाळी भक्कम होत्या. पण सध्या या दोन्ही आघाडया अस्तित्वहीन झाल्यात. भाजप एकट्याच्या बळावर मजबूत झाल्यानं एनडीएची किंमत उरली नाहीय. शिवसेना, अकाली दल एनडीएतून बाहेर पडलेत. तर दुसरीकडे यूपीएत काँग्रेसला राष्ट्रवादी, डीएमके वगळता भक्कम साथीदार मिळत नाहीयत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडलीय. पण अजूनही अधिकृतपणे यूपीएत आलेली नाहीय. शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. पण अनेक राष्ट्रीय मुद्दयांवर शिवसेनेची काँग्रेसला साथ देताना गोची झाली होती. संसदेत नागरिकत्व विधेयकावर, शेतकरी कायद्यांवर काँग्रेसच्या बाजूनं उभं राहताना शिवसेनेचा संभ्रम झाला होता. त्यामुळे थेट यूपीएचा घटक बनणं शिवसेनेला तरी परवडणार का हा प्रश्नच आहे.यूपीएचं अध्यक्षपद पवारांनी स्वीकारावं असं संजय राऊत जेव्हा जेव्हा म्हणतात तेव्हा तेव्हा एकप्रकारे राहुल गांधींच्या अपयशाची चर्चा सुरु होते. कारण काँग्रेस अध्यक्षच यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारत आलेत.एकीकडे राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद तातडीनं स्वीकारावं यासाठी काँग्रेसजन प्रयत्न करत असताना संजय राऊतांच्या या वक्तव्यांमुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय का हाही प्रश्न आहेच.