Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांचं खातेवाटपही आजच जाहीर होण्याची शक्यता
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार खातेवाटप जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. आधीच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने खातेवाटप लवकर जाहीर करण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडणार आहे. तिन्ही पक्षांतील कोणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार याकडे हे जवळपास स्पष्ट झालं आहे. आता कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आजच खातेवाटपही जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये फक्त नावांचीच चर्चा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तीनही पक्षांतील सात मंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर रोजी पार पडला. राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी सायंकाळी झालेल्या बैठकीत अंतिम यादी तयार करण्यात आली. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यादी अंतिम केली. त्यानंतर या याद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यानुसार सोमवारी शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार खातेवाटप जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्षांच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन महिना उलटला आहे. आधीच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटपही लवकरात लवकर होईल, अशी आशा सर्वमान्यांना आहे.
कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?
शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील अशी माहिती आधी मिळत होती. मात्र आता सर्व खाती भरण्यात येतील, असं बोललं जात आहेत.