सोशल मीडियाची कमाल, 41 वर्षानंतर हरवलेल्या आजी सापडल्या
22 जानेवारी 1979 च्या पहाटे पंचुबाई घरातून निघून गेल्या होत्या. त्या 94 वर्षांच्या असून तब्बल 41 वर्षानंतर सापडल्या आहेत.
नागपूर : वास्तव हे कल्पनेपेक्षा विचित्र असते असे म्हणतात. ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे 94 वर्षाच्या नागपूरच्या पंचफुलाबाई. साल 1979 मध्ये पंचुबाई 'मिसिंग' झाल्या, पण चक्क 41 वर्षानंतर त्या 'सापडल्या' आहेत! पण ही कहाणी नुसती "मिसिंग आणि फाऊंड" ची नसून, मानवतेची आहे, प्रेरणादायी आहे.
हा 41 वर्षाचा कालखंड हा असामान्यच म्हटला पाहिजे. पांचूबाई हरवल्या तेव्हा वयाच्या 54 व्या वर्षात होत्या. सहा-आठ महिने आधीच एकुलता एक मुलगा भैय्यालालचे लग्न झाले होते. सुनेचे नाव सुमन. पंचुबाई ह्यांना आधीपासूनच मानसिक रोग होता. भैय्यालाल ने गावाहून नागपूरच्या घरी खास मानसिक ट्रीटमेंटसाठी आईला आणले. पण दैवाला काहीतरी वेगळेच अभिप्रेत होते. 22 जानेवारी 1979 च्या पहाटे पंचुबाई घरातून निघून गेल्या. खूप शोध घेतला पण सापडल्या नाही. पोलीस स्टेशन गाठले, इतर जिल्ह्यात शोध घेतला पण पंचुबाई सापडेना. नंतरच्या काळात भैय्यालाल आणि सुमनला दोन अपत्य झाली - मुलगा पृथ्वी आणि मुलगी ज्योती. पण नातवंडांनी फक्त आपली आजी होती, ती घर सोडून निघून गेली एवढेच ऐकलेले, आजीला बघितलेले ही नव्हते.
हरवल्यावर मधल्या 2 वर्षाच्या काळाबद्दल फारशी काही माहिती मिळत नाही. पण पंचुबाई ह्या चक्क मध्यप्रदेशच्या जबलपूर जवळच्या कोटाकाला गावाजवळील हायवेवर नूरसाहेब खान नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरला सापडल्या. माधमाशांनी चावलेल्या, पायात काचा लागलेल्या , धड बोलता ही न येणाऱ्या, मातीत माखलेल्या स्थितीत पण माणुसकी हेच नूरसाहेबचे खरे नाव म्हटले पाहिजे. नूर साहेबच्या मनाचा मोठेपणा किती असेल की त्याने ह्या अनोळखी स्त्रीला स्वतःच्या घरी आणले. तेव्हापासून नूरसाहेबने पंचुबाईला आपल्या घरी नेले, ती कुठून आली हे विचारायचा प्रयत्न केला. नाव कळले, गाव कळले, पण आडनाव काही कळू शकले नाही. नागपूर पोलिसांना ही संपर्क केला. पण पंचुबाईचा परिवार सापडला नाही. पंचुबाई ह्या नूरसाहेबाच्या परिवारातच राहू लागल्या अच्चन मौसी बनून, अगदी परिवारातीलच एक सदस्य म्हणून. गावाने ही त्यांना आपल्यात सामावून घेतले. गेली 40 वर्ष पंचुबाईचा परिवार म्हणजेच खान परिवार होता. दरम्यानच्या काळात स्वतः नूरसाहेबांचा मृत्यूही झाला, पण अच्चनमौशीची काळजी परिवार घेतच होता. लॉकडाऊनमध्ये घरी असलेल्या परिवारातील एकाने मौसीजे जे सांगू शकत होती त्याचा एक व्हिडियो बनवला आणि तो व्हायरल झाला.
हा व्हायरल व्हिडियो काही जुन्या मंडळींच्या आणि नातेवाइकांच्या हाती लागला. त्यांना शंका आली कि हि भाषा, ह्या बाई पांचूबाईच असाव्यात. त्यातील एकाने हा व्हिडियो पांचूबाईला कधी हि न पाहिलेला त्यांचा एकुलता एक नातू पृथ्वीला पाठवला. कारण पृथ्वीचे वडील आणि पंचुबाईचा मुलगा भैय्याला ह्याचा ही मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला. मात्र पृथ्वी ने हा व्हिडियो आपली आई सुमन हिला दाखवला. लग्न झाल्यावर काही महिने सासूबरोबर नांदायला योग्य सुमनला आला होता आणि तिने पटकन आपल्या साऊसला ओळखले. मात्र इतक्या वर्षाच्या ताटातुटीनंतर हि ज्या मुलाचे नाव पंचउबाई सतत घेत असायची तो भैय्यालाल मात्र फक्त आता हार घातलेल्या फोटोतच उरला होता ही शोकांतिका. 1990 च्या दशकात पंचुबाईचे पती ही वारले होते.
पृथ्वी आणि परिवाराने खान परिवाराला संपर्क केला. लॉकडाऊन संपताच तिथे जाऊन पंचुबाईला घेऊन आले. पांचूबाईला नातवंड, पणतू, पणत्या असा एक माहिती नसलेला परिवार मिळाला. परिवाराला सुद्धा कधी वाटले नव्हते की पंचुबाई जिवंत असतील आणि त्या चक्क वापस येतील. खरं तर भैय्यालाल - सुमन ही दोन नावे आठवणारी पंचुबाईला आजच्या आपल्या घराची मात्र काहीच ओळख नाही. तिच्या तोंडी नूरसाहेबच्या घरच्यांचे नाव सतत असते. समीर येईल, मला झाडाखाली बसायला नेईल, शब्बो येईल मला जेवायला देईल असे म्हणत असतात. तसे मानसिक रित्या फारसे न समजणारी पंचुबाई आज सुख दुःखाच्या पलीकडल्या अवस्थेत आहे, पण त्यांचे सारखे समीर, शब्बो हि नावे म्हणणे हे माणुसकीचे खरे दर्शन घडवणाऱ्या काळाची आठवण होय.