युवा सेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी कंबर कसली, वरूण सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली 'निर्धार अभियाना'ला सुरूवात
Yuva sena : मराठवाड्यातील (Marathwada) आठ जिल्हे आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांत हे 'निर्धार अभियान' राबवण्यात येणार आहे
उस्मानाबाद : एकामागोमाग एक सुरु असलेल्या इनकमिंगमुळे शिंदे गटाची युवा सेना अधिकाधिक स्ट्राँग होत चालली आहे. शिवसेनेसोबत युवा सेनेवर शिंदे गटाचा दावा स्ट्राँग होत चालला आहे. यानंतर आता पक्षसंघटनेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेनंतर युवा सेनेचे (Yuva sena) सचिव वरूण सरदेसाईच्या (Varun Sardesai) नेतृत्वाखाली निर्धार अभियानाचे (Nirdhar Abhiyan) आयोजन करण्यात आले आहे. तुळजापूरला भवानी मातेचे (Tuljapur Bhawani) दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात झाली आहे.
मराठवाड्यातील (Marathwada) आठ जिल्हे आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांत हे निर्धार अभियान राबवण्यात येणार आहे. युवासेनेचे निर्धार अभियान10 ते 20 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. हा 11 दिवसांचा दौरा असणार आहे
आज सोलापूर, उस्मानाबादमध्ये वरुण सरदेसाई यांनी शिवसेना(Shivsena) , युवासेना आणि संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji brigade) पदाधिकाऱ्यांची संयुक्तरित्या बैठक घेतली. सोलापुराच्या विद्यापीठातील सिनेट, अभ्यास मंडळांच्या निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार आहेत. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, बुलढाणा, औरंगाबाद या जिल्ह्यात 48 विधानसभेत विधानसभानिहाय युवासैनिकांच्या बैठका युवा सेना सचिव वरूण सरदेसाई घेणार आहेत.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ही युती निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. ब्रिगेड आणि शिवसेनेची युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट मानली जात आहे.गेल्या आठवड्यात गडचिरोली - चंद्रपूर विद्यापीठाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्येही शिवसेना युवासेना आणि संभाजी ब्रिगेड विजयी झाली आहेत. त्यामुळे हीच विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सोलापुरातही तीच नीती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना थेट रंगला. आता श्रीकांत शिंदे पडद्यामागून सर्व धुरा सांभाळत आहेत. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे युवा सेनेची कमान हाती दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचं थेट आव्हान आता आदित्य ठाकरेंना दिलं आहे. शिवसेना उभी फुटलेली सर्वांनी पाहिली आता युवा सेना वाचवण्याचं काम आदित्य ठाकरे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर आहे.