Aditya Thakckeray : 'दसरा मेळाव्यात शिंदेंनी एसटीवर 10 कोटींचा खर्च केला', उदय सामंतांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं उत्तर
Aditya Thakckeray : इंडिया आघाडीच्या बैठकीवर मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : "गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला असा सवाल विचारत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उदय सामंतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या बैठकीचं (Opposition Meeting) आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा उदय सामंतांकडून (Uday Samant) मांडण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अनेक विरोधी पक्षाचे नेते सध्या मुंबईत दाखल होत आहेत.
50 खोके कुठून आले : आदित्य ठाकरे
दसऱ्या मेळाव्यात शिंदेंनी एसटीसाठी 10 कोटी रुपये दिले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला. त्यासाठीच्या चार्टड प्लेनचा खर्च कोणी केला. स्वत:च्या कार्यक्रमाच्या खर्चावर बोला, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंतांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तसेच 50 खोके कोणी दिले हे आधी सांगा, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
'राम मंदिरासाठी भाजपचं श्रेय शून्य'
"आम्ही स्वत: राम मंदिराच्या ठिकाणी गेलो होतो. राम मंदिराचा विषय बाळासाहेब ठाकरे यांनी समोर आणला होता. आधी मंदिर आणि नंतर सरकार हे आम्ही सांगितलं होतं. राम मंदिर उभारण्यासाठी भाजपचं श्रेय शून्य आहे. जो निकाल आला तो सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचं काही काम नाही," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आम्ही देशाचा आवाज पुढे घेऊन जातोय : आदित्य
"आम्ही देशाचा आवाज पुढे घेऊन जात आहोत. देशाचं संविधान पुढे नेत आहोत. आम्ही लोकशाही लढत आहोत. आम्ही देशाचा आवाज संसदेत पोहोचवणार आहोत. त्यामुळे कोण काय बोलतंय याचा काही फरक पडत नाही. आम्ही सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र आलो आहोत," असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
'आमची लढाई हुकूमशाही विरोधात'
"आमची पहिली बैठक पाटण्यात झाली होती. नंतर बंगळुरुमध्ये झाली. अनेक पक्ष आमच्याशी जोडले जात आहेत. अनेक लोक आमच्याशी जोडले जात आहेत. आमची लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. लोक आता एकत्र येतायत त्यामुळे बदल नक्की होईल," असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
"आज शेतकरी त्रस्त आहेत, महिलांना अनेक अडचणी आहेत. जे लोक घाबरट आहेत ती सगळी लोक एकत्र आली आहेत. त्यांना आपल्या संविधानाशी अडचण आहे. त्यांना आता असं वाटतयं की इंडिया जिंकणार आहे म्हणून ते घाबरलेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपकडे पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा नाही पण आमच्याकडे बरेच चेहरे असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला.