रिंकू राजगुरुसह 'कागर' टीमने घेतलं विठुरायाचे दर्शन, रिंकूला पाहण्यासाठी पंढरपूरकरांची गर्दी
'कागर'ची टीम सध्या प्रमोशनसाठी राज्यभर फिरत आहे. आज या सर्वांनी अकलूज आणि पंढरपूरमधील चित्रपटगृहांना भेट देत प्रेक्षकांना प्रतिसाद पहिला.
पंढरपूर : सैराट सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरुचा दुसरा मराठी चित्रपट कागर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आज पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतलं. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, रिंकू राजगरु, शुभंकर तावडे उपस्थित होते.
'कागर'ची टीम सध्या प्रमोशनसाठी राज्यभर फिरत आहे. आज या सर्वांनी अकलूज आणि पंढरपूरमधील चित्रपटगृहांना भेट देत प्रेक्षकांना प्रतिसाद पहिला. सध्या निवडणुकांची धामधूम सुरु असतानाही कागरला प्रेक्षंकाकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे मकरंद माने यांनी सांगितले.
राज्यात 375 सिनेमागृह आणि आठवड्यात 7 हजार शो सुरु असलेल्या 'कागर'ची तुलना 'सैराट'सोबत करणे चुकीचे आहे. तसेच कागर सिनेमात सैराटचा स देखील नसल्याचं मकरंद माने यांनी सांगितलं.
सैराटला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर रिंकूला कागर सिनेमाकडूनही तेवढ्याच अपेक्षा आहेत. या चित्रपटात राजकीय भूमिका असल्याबाबत छेडले असता, आपल्याला राजकारणात रस नसल्याचं रिंकूने सांगितले. कागरच्या टीमचा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सदस्य संभाजी शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. रिंकू राजगुरू मंदिरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने तिला पाहण्यासाठी पंढरपूरकरांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.