(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संकटकाळात मदतीला धावून जाणाऱ्या विघ्नहर्त्यांचा एबीपी माझाकडून सन्मान, चौथ्या विघ्नहर्ता पुरस्काराचे वितरण
माझा विघ्नहर्ता 2022 हे या पुरस्कारांचं चौथं वर्ष आहे.खऱ्या आयुष्यात विघ्नहर्ता म्हणून धावून जाणाऱ्या माणसातल्या विघ्नहर्त्यांना आज माझा विघ्नहर्ता पुरस्कार देऊन आज सन्मानित केलं.
मुंबई : एबीपी माझाने गणेशोत्सवाचे उत्सवी स्वरुप न ठेवता खऱ्या आयुष्यात विघ्नहर्ता म्हणून धावून जाणाऱ्या माणसातल्या विघ्नहर्त्यांना आज माझा विघ्नहर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केलं. राजेंद्र भोसले, अमोल जागले, रामेश्वर चौधरी आणि प्रदीप मळावी, दत्ता देसाई विमल बाई भिल, रोहन रामचंद्र बहिर यांना गौरवण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते,
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, एबीपी माझाचा हा स्तुत्य उपक्रम आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या कामाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली. खऱ्या आयुष्यात विघ्नहर्ता म्हणून धाऊन जाणाऱ्या माणूस हाच खरा विघ्नहर्ता आहे. माध्यमांना कधी कधी लोक विघ्नहर्ता कमी विघ्नकर्ता जास्त समजतात. परंतु विघ्नहर्ता पुरस्काराचे आयोजन करून एबीपी माझाने माध्यमांमध्ये असलेल्या लोकांच्या समजुतीला छेद दिला आहे. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये या पुरस्कारांचं आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्या कांचन नितीन गडकरी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान या देखील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
166 बेपत्ता मुलींचे विघ्नहर्ता राजेंद्र भोसले
डीएन नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजेंद्र भोसले यांनी 2008 ते 2015 या काळात तब्बल 166 मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणं नोंदवली होती. त्यापैकी 165 मुलींना शोधून काढण्यात त्यांना यश मिळालं. 165 मुलींना त्यांच्या आई वडिलांची, नातलगांची पुनर्भेट त्यांनी घडवून आणली. शोध लागला नव्हता तो फक्त एका मुलीचा… पुजा गौड हिचा… 2013 मध्ये अवघ्या सात वर्षांच्या पुजाचं मुंबईतून अपहरण झालं आणि तेव्हापासून राजेंद्र भोसले तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. पण यश येत नव्हतं. 2015 मध्ये राजेंद्र भोसले पोलीस सेवेतून निवृत्त झाले. मुंबईतून खेडला राहायला गेले पण त्यांनी पुजाचा शोध थांबवला नव्हता. खिशात तिचा छोटासा फोटो घेऊन ते सतत तिचा शोध घेतच राहिले. पुजाच्या कुटुंबियांना आधार देत राहिले. आणि अखेर ती पुजा तब्बल 9 सापडली आहे. आपल्या आई पासून, वडिलांपासून दुरावलेली लेक तिच्या हक्काच्या घरात परतली. केवळ पुजाच नाही तर 166 मुलींचे विघ्नहर्ता बनलेल्या राजेंद्र भोसले यांना एबीपी माझाचा सलाम!
गावकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारे अमोल जागले
गाव अंधारात राहू नये म्हणून आपला जीव धोक्यात घालणारा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी... अतीवृष्टीमुळे रायंबे गावचा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याने थेट मुकणे धरणातील पुराच्या पाण्यात उडी घेतली. वीज नसल्यानं गावकऱ्यांचे होत असलेले हाल दूर करण्यासाठी अमोल भर पुरात तब्बल तीनशे मीटर आत पोहत गेला आणि तिथल्या खांबावर चढून तासभर काम करत वीजपुरवठा पूर्ववत केला. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक गावांना उजेडात आणणाऱ्या याच अमोलच्या आयुष्यात आता मात्र अंधार पसरलाय. कारण मागच्याच महिन्यात एका खांबावर चढून दुरुस्तीचं काम करत असताना त्याला वीजेचा धक्का बसला आणि तो खाली कोसळला. त्याचा डावा पाय पूर्णपणे निकामी झालाय. घरची परिस्थिती हलाखीची आहे. इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या अमोलला माझा विघ्नहर्ता पुरस्काराने सन्मानित केले आहे.
रामेश्वर चौधरी व प्रदीप मळावी
गोंदिया जिल्ह्यात येत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसांडून वाहत होते. या पावसामुळे तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या पांजरा गावातील नाल्याच्या पुरात अडकले असलेल्या बुरुड समाजाच्या जोडप्यांना पांजरा येथील रामेश्वर चौधरी व प्रदीप मळावी या दोन इसमांनी सुरेश ऊके आणि उरमीला उके या दोघांना दोर बांधून लाकडावर बसवून महिला आणि पुरुषाला अडकलेल्या ठिकाणावरुन सुरक्षित ठिकाणी जवळपास 300 मीटर ओढत आणून दोघांचे प्राण वाचविले. रामेश्वर आणि प्रदीप हे दोघे पूर पाहण्यासाठी गेले असताना त्याने उके कुटुंबीय अडकले असताना या दोघांनी त्यांना मदत केली
दत्ता देसाई
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. एक महिला पुराच्या पाण्यात वाहत जात आहे. पण तिने एका झाडाच्या फांदीला धरलं आहे. त्यामुळे वाचण्याची संधी जास्त असून मदतीची गरज आहे. यावेळी ड्युटीवर असलेले दत्ता देसाई तडक त्या ठिकाणी निघाले. प्रशासनासह प्रत्येकानं महिलेला वाचवण्याचे केलेले प्रयत्न असफल ठरले होते. कारण पाण्याच्या वेगापुढे टिकाव धरण केवळ अशक्य होतं. अशावेळी देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला कमरेला एक दोरी बांधली आणि थेट पुराच्या पाण्यात उडी मारली. एखाद्या चित्रपटाला शोभावा असाचा हा सीन होता. पण हेच वास्तव होतं. दत्ता देसाई त्या महिलेसमोर पोहोचले खरे, पण तिला वाचवत असताना पाण्याच्या प्रवाहापुढे टिकाव लग्नात केवळ अशक्य होतं. अशावेळी देसाई यांनी मोठ्या सीताफिने सदर महिलेची कंबर धरली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. कठीण आणि अथक अशा प्रयत्नानंतर या महिलेला दत्ता देसाई यांच्या धाडसामुळे वाचवण्यास यश आलं होतं. देसाई यांनी जीवाची परवा न करता पाण्याच्या प्रवाहात उडी मारली. त्यामुळे एक आई आणि एक पत्नी तर वाचलीच पण संपूर्ण कुटुंबासाठी दत्ता देसाई हे विघ्नहर्ता ठरले होते.
विमलबाई भिल
मागील वर्षी धुळे येथील विमान प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण देणारे लहान विमान जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात जंगल परिसरात कोसळलं होते. या विमानात दोन प्रशिक्षण घेणारे तरुण तरुणी होते. विमान कोसळताच त्यातील तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर विमान चालक तरुणी गंभीररीत्या जखमी झाली होती. या तरुणीला तात्काळ दवाखान्यात नेणे गरजेचे होते,मात्र विमान अशा जंगल परिसरात कोसळले होते की, त्या ठिकाणी कोणतेही वाहन अथवा रूग्णवाहिकेला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या पुढे या तरुणीला तीन किमी अंतर रस्त्यापर्यंत न्यावे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. या वेळी विमान कोसळले त्या परिसरात शेत मजुरी करणाऱ्या विमल बाई भिल या ठिकाणी अपघात पाहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गंभीर अवस्थेत असलेली तरुणी त्यांना दिसली. तरुणीला उचलून नेण्यासाठी कोणतेही साधन त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने मदत करणाऱ्यांची अडचण लक्षात आल्यावर विमल बाई यांनी आपल्या अंगावरची अर्धी साडी कापून देत त्या तरुणीसाठी झोळी उपलब्ध करून दिली. विमल बाई यांच्या अर्ध्या साडीची झोळी करून तरुणांनी गंभीर जखमी तरुणीला दवाखान्यात नेल्यामुळे वेळीच उपचार झाल्याने विमान चालक तरुणीचा जीव वाचला होता. शेतात शेतमजुरी करणाऱ्या आणि कधीच शाळेत न गेलेल्या विमल बाई यांनी अंगावरची साडी कापून देण्याचे धाडस,आणि समय सूचकता यामुळेच त्या तरुणीचे प्राण वाचले आहेत. त्या तरुणी साठी विमलबाई या विघ्न हरता ठरल्या आहेत.
छोट्या रोहनने वाचवले होते नदीत हून जाणाऱ्या महिलेचे प्राण
पाण्यात वाहून जात गेलेल्या 43 वर्षीय महिलेचे रोहन रामचंद्र बहिर 14 वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत वाचवले. नवगण राजुरी (ता. बीड) येथील नदीत अनेक महिला कपडे धुण्यासाठी जातात. छाया जालिंदर गायकवाड या कपडे धुण्यासाठी नदीतून जात असताना वाहाचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून जाऊ गल्या. गावातील रोहन रामचंद्र बहिर हा 14 वर्षीय मुलाने नदीत वाहत जाणाऱ्या छाया यांना पाहताच प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन त्या प्रवाहाबाहेर काढले.