Majha Katta : नेहरु असताना काहीतरी सकारात्मक घडतंय असं वाटायचं, नंतरच्या काळात तसं घडलं नाही; ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी
साने गुरुजींनी निस्वार्थीपणाचा आणि साधेपणाचा कानमंत्र दिला. सेवा दलात काम करताना या सर्व गोष्टी शिकल्या, साधेपणा अंगवळणी पडला असं ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी यांनी सांगितलं.
मुंबई: स्वातंत्र्यानंतर लोक सुखी होतील, शेतकरी समाधानी होतील असं वाटलं. पण आज त्यातलं काहीच झालं नाही. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना देशात काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय असं वाटायचं. पण त्यानंतरची पुढची वर्षे काँग्रेसमध्ये तशा प्रकारचं काम झालं नाही असं ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी म्हणाले. वयानं, मानानं आणि कर्मानं जेष्ठ असलेले दत्ता गांधी यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
एखाद्या व्यक्तीने किती निस्वार्थीपणे काम करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे दत्ता गांधी. वयाच्या जेमतेम विशीत असताना त्यांनी महात्मा गांधी यांच्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला. राष्ट्रसेवा दलाचं काम शेवटपर्यंत केलं. त्यांनी नुकतंच 100 व्या वर्षात पदार्पण केलं असून या शंभरीचा प्रवास हा विलक्षण आहे.
साने गुरुजींनी निस्वार्थीपणाचा आणि साधेपणाचा कानमंत्र दिला. सेवा दलात काम करताना या सर्व गोष्टी शिकल्या, साधेपणा अंगवळणी पडला. साने गुरुजींनी मला शिक्षक व्हायचा आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा संदेश दिला. त्यामुळे आपण शिक्षकी पेशा स्वीकारला असं दत्ता गांधी म्हणाले.
गांधीजींची भेट झाली
गांधीजींसोबत झालेल्या पहिल्या भेटीवेळची आठवण जागवताना दत्ता गांधी म्हणाले की, "1944 साली औंधला शिबिर झालं. ते संपल्यानंतर आम्ही गांधीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. त्यावेळी मला गांधीजींना आणण्यासाठी बाजूच्या खोलीमध्ये पाठवण्यात आलं. मला पाहिल्यानंतर गांधींजी उभे राहिले. त्यांनी कोपऱ्यातील काठी घेतली आणि डावा हात माझ्या खांद्यावर घेतला. त्यावेळी ते मौनामध्ये होते. एका पाटीच्या सहाय्याने त्यांनी गावामध्ये जा, आणि ग्रामीण भागात सुधारणा करा असा संदेश दिला."
आपल्या मोठ्या बंधूंना मीठाच्या सत्याग्रहावेळी अटक केली. आई-वडीलही स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्याचा परिणाम माझ्या जीवनावर झाला. पटवर्धन गुरुजींनी मोडी लिपीत लिहिलेले कागदं चोरलं आणि ते घरी आणले. त्यानंतर वडिलांनी शिक्षा देताना पटवर्धन गुरूजी मध्ये आहे आणि मला चांगलं अक्षर शिकवणार असल्याचं सांगितलं. मला कुणाचं चांगलं अक्षर दिसलं तर त्याचा मोह होतो अशी एक आठवण त्यांनी सांगितली.
नदीत पोहून जाऊन कचेरीवर झेंडा फडकावला
दत्ता गांधी म्हणाले की, "त्यानंतर सर्व मोठ्या नेत्यांना पकडण्यात आलं, त्यावेळी आम्ही शाळा सोडल्या. त्यावेळी माझा मित्र कमलाकर आणि मी कचेरीवर झेंडा रोवण्याचं ठरवलं. मग रात्री सावित्री नदी पोहून पार केली आणि कचेरीच्या मागून जाऊन रात्री साडे बारा वाजता झेंडा लावला. मग रक्ताने एका कागदावर लिहिलं की स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही असं ठरलं. मग दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास मामाचं घर सोडलं. त्यानंतर आम्ही 1942 च्या आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर तुरुंगवास लाभला."
विसापूरमध्ये तुरुंगवास
विसापूरमध्ये तुरुंगात असताना आमच्यावर ब्रिटिशांनी अन्वयित अन्याय केला. सोमवारी आणि बुधवारी लाठीचार्ज व्हायचा. अनेकांच्या शरीरावर काठीचे दोनशे फटके बसल्याचे निशाण असायचे. त्या वेळी खायच्या अन्नातही किडे, मुंग्या सापडायचा.
त्यावेळी मी सकाळी साडेचारला उठायचो, नळाखाली अंघोळ करायचो आणि व्यायाम करायचो. या काळात मी 194 पुस्तके वाचले. संध्याकाळी चारच्या सुमारास सर्व कैदी एकत्र यायचे, चर्चा व्हायची. मग त्यावेळी मी सेवा दलाचे ड्रिल घ्यायचो.
आंबेडकरांचा सहवास लाभला
साधारणपणे 1939-40 च्या दरम्यान महाडच्या जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृशांची सभा घेतली. मी त्यावेळी त्या सभेला गेलो. मी त्यांना विचारलं की, आम्ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी काय करु शकतो. त्यावेळी ते म्हणाले की, तू खूप वाच, चिंतन कर. त्यावेळी तुला समजेल की अस्पृश्यता हे ढोंग आहे. त्यामुळे समाजाचं नुकसान होतंय. त्यानंतर मला या संबंधी काहीतरी करायला पाहिजे असं सातत्याने वाटायचं. मग मी सेवा दलाच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये काम केलं.
नेहरु असताना काहीतरी घडतंय असं वाटायचं
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदू-मुस्लीममांध्ये दंगली सुरू होत्या. त्यावेळी हे स्वातंत्र्य तुटक होतं असं वाटलं. उरण या ठिकाणी आम्ही स्वातंत्र्याच्या दिवशी झेंडा फडकावला. स्वातंत्र्यानंतर लोक सुखी होतील, शेतकरी समाधानी होतील असं वाटलं. पण आज त्यातलं काहीच झालं नाही. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना देशात काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय असं वाटायचं. पण त्यानंतरची पुढची वर्षे काँग्रेसमध्ये तशा प्रकारचं काम झालं नाही. नेहरुंच्या काळात अनेक नेते हे अगदी साधेपणाने जगत होती. आज त्यामध्ये बदल झाला असून सर्व अपेक्षाभंग झाल्याचं वाटतंय.