(Source: Poll of Polls)
Exclusive : माझं वय आकड्यांवर नाही, ते माझ्या मनावर आहे; वय म्हणजे, फक्त आकडे असतात : आशा भोसले
गायिका आशा भोसले यांना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी 1997मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
मुंबई : असंख्य संगीत प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी आशा भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानिमित्ताने आशा भोसले यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.
एबीपी माझाशी बोलताना आशा भोसले यांनी पुरस्कार मिळायला उशीर झाला अशी खंत व्यक्त केली. त्यासंदर्भात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी विचारलं असता त्या म्हणाल्या की, "मला असं वाटतं की, सगळे पुरस्कार तरुण वयातच मिळालेले बरे. कारण त्यावेळी तो आनंद साजरा करता येतो. अगदी उतारवयात पुरस्कार मिळतो, त्याला काहीच अर्थ नसतो. कारण काय मिळालंय आपल्याला माहिती नसतं किंवा कशाला मिळालंय आपल्याला हेसुद्धा माहिती नसतं. वयाच्या 88व्या वर्षी ज्यावेळी मी गातेय, प्रोग्राम करतेय त्यावेळी मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल मला खरंच आनंद होतोय." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "माझं वय आकड्यांवर नाही, तर ते माझ्या मनावर आहे. वय म्हणजे, फक्त आकडे असतात."
"जन्माला येताना जो स्वभाव असतो ना, तोच असावा माझा. आणि उत्साही दुसऱ्यांना हसत ठेवायचं, दुसऱ्यांना रडवायचं नाही, आपण कुणासमोर रडायचं नाही. तसेच इतरांसमोर जाताना नेहमी प्रेजेंटेबल असावं. ही माझी नेहमीची वृत्ती आहे.", असं आशा भोसले म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचं मुख्यमंत्र्यांकडून कळालं. मी त्यासाठी त्यांना धन्यवाद देते की, त्यांनी असा विचार केला."
पाहा व्हिडीओ : Maharashtra Bhushan पुरस्कार मिळाल्याचा आनंद;ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची माझाला पहिली प्रतिक्रिया
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी ज्यावेळी प्रसारित केली त्यावेळी सर्वात पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आली. याबाबत बोलाताना आशा भोसले म्हणाल्या की, "मी बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांना भेटले आहे. ते मुख्यमंत्री असताना माझी त्यांनी मदतही केली होती. ज्यावेळी माझ्या बाजूनं कोणीच उभं राहिलं नव्हतं, त्यावेळी ते माझ्या मागे उभे राहिले होते. एकदा त्यांच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळी त्यांनी माझं 'पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती' गाणं ऐकलं होतं. त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले की, तुम्ही लोकांना किती आनंद दिलेला आहे. त्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती."
एबीपी माझाशी बातचित करताना आशा भोसले यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, "संपूर्ण देशच माझ्यावर प्रेम करतो. पण महाराष्ट्र माझा आहे. इथल्या लोकांनी मला नेहमची खूप प्रेम दिलं आहे. आपली आई, बहिणी सारखं लोकांनी प्रेम केलं आहे." यावेळी आशा भोसले यांनी एक किस्साही सांगितला. त्या म्हणाल्या की, "अमेरिकेत एका ठिकाणी माझा कार्यक्रम होता. त्यावेळी सगळी मराठी माणसं तिथे होती. त्याठिकाणी ते काम करत होते. कार्यक्रमासाठी मी स्टेजवर गेल्यावर सगळ्यांनी शीट्या मारायला सुरुवात केली. त्यावेळी मीसुद्धा त्यांना एक शिट्टी मारुन म्हटलं की, आता बंद करा. सगळे हसायला लागले. फारच सुंदर कार्यक्रम झाला होता. महाराष्ट्र माझं माहेरच आहे."
आशाताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आग्रह केल्यानंतर आशा भोसले यांनी 'पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती' हा अभंग महाराष्ट्रासाठी सादर केला.
महत्वाच्या इतर बातम्या :