कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्या सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या असत्या. लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर नगरी दुमदुमून गेली असती.


अवघाची संसार सुखाचा करिन
आनंदे भरीन तिन्ही लोका...
जाईन ग माये तया पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया..


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आषाढीसाठी राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी आज पंढरपूरमध्ये प्रवेश केला असता. काल वाखरीमध्ये रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माऊली महाराजांबरोबरच संत सोपान काका आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या या वाखरीमध्ये विसावल्या. खरंतर एकदा का वारकरी वाखरीमध्ये पोहोचले की वाखरी आणि पंढरपूरमध्ये अंतरच शिल्लक राहत नसायचे.



(PHOTO : सचिन सोमवंशी)

वाखरीमध्ये पोहोचलेल्या मानाच्या पालख्यांमध्ये संत भेटीचा कार्यक्रम झाला की.. सगळ्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पंढरपूरकडे पाठवून शेवटी माऊली महाराजांचा पालखी सोहळा हा दुपारी वाखरीमधून प्रस्थान ठेवत असे. प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज सकाळी साडेबारा वाजता संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याने सगळ्यात आधी वाखरी मधून प्रस्थान केले असते. दुपारी एक वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला असता आणि सगळ्यात शेवटी दुपारी दीड वाजता माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले असते.


दरवर्षी वाखरीला एकदा मानाच्या पालख्या पोहोचल्या की वारकरी मात्र पुढे पंढरपूरकडे निघायला सुरु झालेले असायचे. रथाच्या पुढच्या आणि रथाच्या मागच्या मानाच्या दिंडीतील वारकरी जर सोडले तर इतर लोक मात्र पंढरपूरमध्ये जाऊनच मुक्काम करत असतात. त्यामुळे प्रथेप्रमाणे आज वारी निघाली असती तर आषाढीच्या एक दिवस आधीच पंढरपूरमधल्या चंद्रभागेच्या वाळवंटात पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसती. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आधी चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करायचे. त्यानंतरच आपल्या सावळ्या विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत लागायला वारकर्‍यांनी सुरुवात केली असती.


प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आज संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव ,संत मुक्ताबाई आणि संत एकनाथ यांच्यासह शंभरपेक्षा जास्त पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी वाखरीमध्ये मुक्काम केला असता. वाखरी आणि पंढरपूरमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोजली तर काल सकाळपासून सुरु झालेले वारकरी आज रात्रीपर्यंत चालतानाच दिसायचे. त्यामुळे चालणारा पहिला वारकरी हा वाखरीमध्ये असेल तर शेवटचा वारकरी हा पंढरपूरमध्ये दाखल झालेला जायचा. वाखरी ते पंढरपूर या रस्त्यात ज्ञानोबा तुकोबा चा जयघोष व्हायचा. आता तर तो आवाज क्षणाक्षणाला वाढताना पाहायला मिळत होता कारण जसं विठ्ठल मंदिर दृष्टीक्षेपात येत होतं तसं वारकरी तृप्त झाल्याचं पाहायला मिळत होतं.



(PHOTO : सचिन सोमवंशी)

प्रथेप्रमाणे आषाढी पायी वारी निघाली असती तर आज सगळ्यात आधी पंढरपूर शहरातील विसावा पादुका पादुका मंदिराजवळ संत सोपान काकांचा पालखी सोहळा हा तीन वाजेपर्यंत पोहोचला असता. त्यानंतर चार वाजेपर्यंत संत निवृत्तीनाथांची पालखी पादुका मंदिरापर्यंत पोहोचले असते. एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी विसावा चौकापर्यंत येऊन पोहोचल्या की सगळ्यात शेवटचं रिंगण याठिकाणी मोठ्या भक्तिभावात पार पडले असते. एकूण आषाढी वारीमधलं सगळ्यात शेवटचे रिंगण हे याठिकाणी पार पडले असते.



(PHOTO : सचिन सोमवंशी)

पंढरपूरच्या वेशीला माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला की मोठ्या दिमाखात याठिकाणी स्वागत सोहळा पार पडला असता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत माऊली महाराजांचा पालखी सोहळा इसबावीमध्ये पोहचला असता आणि याच ठिकाणी ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषामध्ये वारकऱ्यांच्या उत्साहाला आलेले उधाण पाहायला मिळाले असते.


विसावा पादुका मंदिराजवळ एकदा हा पालखी सोहळा पोहोचला की वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा आनंद द्विगुणित झाला असता. कारण ज्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी शेकडो किलोमीटरचे अंतर कापून मजल दर मजल करीत पंढरपूरकडे निघाले होते ते आज त्यांच्या विठ्ठलाला भेटणार होते यावेळी वारकऱ्यांच्या टाळ मृदंगातून होणारा ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अवघे आसमंत व्यापून टाकत असत. याच ठिकाणी माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यावर हजारो भाविकांनी खारीक आणि बुक्क्याची मुक्तपणे उधळण केली असती.


प्रथेप्रमाणे आज वारी निघाली असती तर आषाढी एकादशी साठी पंढरपूर मधले सगळे मठ, हॉटेल, धर्मशाळा, मंदिर परिसर आणि छोटे-मोठे घरसुद्धा वारकऱ्यांनी फुलून गेले असते. राहुट्या आणि तंबू वर उभारलेले भगवे ध्वज जणू आकाशाची स्पर्धा करतायेत असा भास झाला असता. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून आलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्नता ही मंडळी आपल्या विठ्ठलाशी कशाप्रकारे अशाप्रकारे एकरुप होतात याची जणू प्रचितीच देत असतात.



(PHOTO : सचिन सोमवंशी)

चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकरी यावेळी गर्दी करत असायचे. वाळवंटातून सुद्धा ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष कानी पडायचा त्यावेळी जे भक्त आषाढीसाठी राज्य आणि राज्याबाहेरुन आलेले असायचे ते भाविक अचंबित होऊन पाहत असायचे. चंद्रभागेच्या काठावरती 65 एकरमध्ये दिंड्यांना उतरवण्यासाठी जी जागा आरक्षित केली आहे तिथे या वेळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसती.


क्रमशः


यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे