कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलीची आणि सोपान काकांची बंधू भेट ही टप्प्यावर झाली असती. तिथून पुढे माऊलींच्या पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश केला असता.


कोरोनाच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द झाली. सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरमधून आषाढीला पंढरपूरमध्ये नेण्याची घोषणा झाली. मात्र दोन दिवसांपूर्वी माऊली आणि तुकाराम यांच्या पादुका या एसटीनेच पंढरपूर जाण्यासाठीचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असे किती तरी कुटुंब आहेत, त्यांच्या कुटुंबाला आषाढी वारीची मोठी परंपरा आहे. यातील अनेक कुटुंबांमध्ये तर पंजोबापासून आजोबाकडे आणि आजोबापासून आता नातवंडाकडे वारीचा वारसा चालत आलेला आहे.



प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आज माऊलींच्या पालखी सोहळ्याने माळशिरस तालुक्यातील आपला मुक्काम आटोपता घेऊन पंढरपूर तालुक्यामध्ये प्रस्थान केले असते. माऊली महाराजांच्या एकूण मार्गक्रमणातील आजचा दिवस हा महत्त्वाचा असला असता. कारण आजच्या दिवशीच सोपान काका आणि माऊलींची बंधू भेट ही टप्पावर झाली असती. हाच बंधू भेटीचा अनमोल क्षण अनुभवण्या


साठी टप्प्यावरती वारकरी आणि पंचक्रोशीतील मंडळींनी तोबा गर्दी केली असती.



भंडीशेगावमधून माऊलींच्या पालखी सोहळ्याने माळशिरस तालुक्याची हद्द ओलांडून पंढरपूर तालुक्यातील हद्दीमध्ये प्रवेश ठेवला असता. आता अवघ्या काही किलोमीटरवरती पंढरपूर आले असते. त्यामुळे कधी एकदा पंढरपूरला पोहोचतो आणि सावळ्या विठुरायाला भेटतो याचीच आस वारकऱ्यांन लागलेली असायची.


वेळापूरहून निघाल्यानंतर पहिल्या विसाव्यालाच ठाकूरबुवाची समाधी येथे माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील तिसरे रिंगण रंगले असते. ठाकूर बुवाची समाधी येथे पोहोचेपर्यंत माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असायची भल्यामोठ्या विस्तीर्ण अशा शेतामध्ये होणाऱ्या या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वारकरी डोळे भरून बघितले की आषाढी वारी नेमकी कोणाची आहे आणि आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रती आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठीची आतुरता कशाप्रकारे ठासून भरलेली आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.



संत सोपान काकाच्या सासवडमध्ये माऊली पोहोचल्या नंतर दोन दिवस मुक्कामाला थांबले होते आणि त्यानंतर सोपान काकांचे प्रस्थान झालं होते. त्यानंतर आज तोंडले बोण्डलेमध्ये या बंधू भेटीच्या सोहळ्याची मोठी कीर्ती आहे. या दोन भावंडांची ही बंधू भेट बघण्यासाठी टप्प्यावर आज पाय ठेवायला देखील वारकऱ्यांना जागा मिळाली नसती.


खरंतर मागच्या 18 ते 20 दिवसांपासून मजल दर मजल करत हे वारकरी ज्यावेळी पंढरपूरजवळ पोहोचतात, त्यावेळी या वारकऱ्यांमध्ये एकमेकांप्रती समर्पणाची भावना सुद्धा पाहायला मिळते. कारण ज्यावेळी वारीमध्ये जायचं ठरलेलं असतं, त्यावेळी वारीत आपल्या सोबत कोण असेल? कुठला असेल? याची माहिती नसलेले वारकरी हे मागच्या 15 ते 20 दिवसाच्या एकूण मार्गक्रमणामध्ये इतके एकमेकांशी एकरूप झालेले असतात की एकदा पंढरपूरमध्ये गेले की पुढे वर्षभर आपली गाठभेट होणार नाही, याची प्रचिती वारकऱ्यांना आलेली असते.


माऊली महाराजांचा पालखी सोहळा दुपारपर्यंत बोंडले या गावी पोहोचल्यानंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचा आणि माऊलींच्या पालखीचं मोठ्या उत्साहातमध्ये या ठिकाणी स्वागत झालं असतं. तोफांची सलामी देऊन याठिकाणी माऊलींची पालखी रथातून बाहेर काढून खांद्यावर घेऊन ती तोंडले गावाच्या दिशेने पोहोचली असती.


 


दुपारचे जेवण आणि विश्रांतीसाठी माऊली महाराजांचा पालखी सोहळा तोंडले-बोंडले या गावी पोहोचला की याच ठिकाणी दही-धपाटे आणि चटणीचा बेत ठरलेला असायचा. आज पालखी सोहळा तोंडले-बोंडले गावी येणार आहे, म्हणताच सकाळपासून तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आणि इतर छोट्या खेड्यातून गावातल्या प्रत्येक घरातून थालीपीठ भाकरी आणि धपाट्याचा आज ढीग लागला आसता. पालखी मार्गात अनेक गावांमध्ये वारकऱ्यांसाठी गोडधोड जेवणाचा बेत असायचा मात्र आजचा दही धपाट्याची शेकडो वर्षांपासून या तोंडले-बोंडले या गावी ही परंपरा चालत आलेली आहे.


तोंडले-बोंडले या गावच्या ओढ्यावर श्रीकृष्णाने आपल्या गोपाला समवेत गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. म्हणूनच ही परंपरा या परिसरातील गावकरी आणि वारकरी मोठ्या खुबीने जपताना पाहायला मिळाले असते.


दुपारी दोनच्या नंतर माऊली महाराजांचा पालखी सोहळा टप्प्यासाठी मार्गस्थ झाला. आता याच ठिकाणी रस्त्यावर होणारी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण केलं जायचं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत माऊलीचा पालखी सोहळा टप्प्यावर पोहोचला असता तर त्यानंतर माऊलींचे ज्येष्ठ बंधू सोपान देवांचा पालखी सोहळा टप्प्यावर पोहोचतात. सगळीकडे ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला असता. माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मालक आरफळकर सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुखांना नारळ भेट दिले असते. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' असा जयघोष झाला असता आणि टाळ-मृदंगाच्या गजरातमध्ये बंधू भेटीचा सोहळा याच टप्प्यावर आज रंगला असता.


राज्यातून येणाऱ्या जवळपास छोट्या-मोठ्या सगळ्यांचे पालखी सोहळ्याने आता पंढरपूर तालुक्यांमध्ये प्रवेश केला असता. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम हा भंडीशेगावमध्ये झाला आता. प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सकाळीच बोरगाव होऊन प्रस्थान ठेवले असते. माळखांबी तोंडले-बोंडले आणि टप्पा पार करून करून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम पिराची किरोलीमध्ये राहिला असता.


क्रमशः


यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे :