रत्नागिरी : कोरोना रूग्णांचा आकडा हा रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा हा 580वर पोहोचला असून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे 70 टक्के पेक्षा देखील जास्त आहे. दरम्यान, अशा काळात आता रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या औषध खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केली आहे.


बोल्डे यांच्यासह आणखी देखील काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय, यासाऱ्या औषध खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कमिटीची देखील स्थापना करण्यात आली असून कमिटीचा अहवाल नेमका काय येतो? हे आता पाहावं लागणार आहे.मागील काही दिवसांबाबत या औषध खरेदी व्यवहाराबाबत रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात येत होती. अखेर या साऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली असून जिल्हा शल्य चिकित्सक बोल्डे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.





कर्मचाऱ्यांच्या देखील होत्या तक्रारी


औषध खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्य चिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असले तरी त्यांच्याविरोधात जिल्हा रूग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. शिवाय, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेत त्याबद्दल तक्रार देखील करण्यात आली होती. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत लक्ष न दिल्याने, सारी बाब गांभीर्याने न घेतल्याने जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काहीशी आक्रमक भूमिका देखील घेतली होती. त्यावेळी मंत्री, आमदार यांनी हस्तक्षेप करत या साऱ्या प्रकरणावर पडदा पाडला होता. शिवाय, यापूर्वी देखील जिल्हा रूग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मंत्री, आमदार यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते. पण, कोरोना सारख्या कठिण काळात पावले उचलताना सावध उचलली पाहिजेत अशी भूमिका घेत केवळ समज ही जिल्हा शल्य चिकित्सकांना दिली जात होती. पण, अखेर औषध खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना अखेर सक्तिच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :