कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. यंदा आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींची पालखी मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीसाठी जेजुरीला गेली असती. ज्ञानोबा-तुकोबांसोबतच यळकोट यळकोट जय मल्हारचा एकच जयघोष आज जेजुरीमध्ये झाला असता.


माऊलीच्या पालखी मार्गातील दोन दिवसाचा विसावा पहिल्यांदा पुण्यात आणि त्यानंतर लगेच सासवडमध्ये होत असतो. सासवडमध्ये बंधू सोपानकाकांचं प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माऊलींचे प्रस्थान होत असतं. ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवडमध्ये माऊलीला निरोप देताना पालखी ही जेजुरी नाक्यापर्यंत खांद्यावर आणण्याची प्रथा आहे. एकूण पालखी मार्गामध्ये माऊलीच्या प्रस्थानावेळी रथातच माऊलीला निरोप दिला जायचा. मात्र सासवडमध्ये सासवडकर आपल्या खांद्यावरुन माऊलींची पालखी. खांद्यावर घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर पालखी गावच्या वेशीवर आणली जायची आणि पुन्हा रथामध्ये ठेवली जायची. प्रथेप्रमाणे आज वारी निघाली असती तर माऊलींच्या पालखीच सकाळीच सासवडमधून प्रस्थान झालं असतं.


ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आता मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीची आस लागलेली असते. सासवडहून निघालेल्या माऊलीच्या पालखीसोबतचे वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचायला सुरु झालेले असतात. आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पहिल्यांदाच वारकऱ्यांना विस्तीर्ण असा पालखी मार्ग मिळालेला असायचा. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना वारकरी मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या भेटीसाठी जणू आतुर झाल्याचे चित्र पाहायला मिळायचे.



पंढरीत आहे रखुमाई, येथे म्हाळसा-बाणाई ।
तेथे विटेवरी उभा, इथे घोड्यावरी शोभा ।।
तेथे पुंडलीकनिधान, इथे हेगडी प्रधान ।
तेथे बुक्क्याचे रे लेणे, इथे भंडार भूषणे ।।
तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा ।
तेथे मृदंग-वीणा-टाळ, येथे वाघ्या-मुरळीचा घोळ ।।


सासवडचा निरोप घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आता रस्त्यामध्ये ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत असायचा. कधी डोक्यावर येणारे निरभ्र आकाश तर कधी मध्येच येणारे ढग आणि पावसाच्या दोन-चार थेंबाने वातावरण प्रसन्न व्हायचे. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सोबतच आता यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने आसमंत दणाणून निघायचे. दहा वर्षापूर्वी मी पहिल्यांदा ज्यावेळी वारी कव्हर करण्यासाठी आलो होतो, त्यावेळी मला एक प्रश्न कायम पडायचा..लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा अंतर चालून जात असताना यांना नेमकी एनर्जी मिळते कुठून?


माझ्या प्रश्नाचे उत्तर मला त्या वेळेस मिळाले होते ज्यावेळी मी सुद्धा या वारकऱ्यांसोबत चालायला सुरुवात केली होती. यावेळी कुठून अभंग तर कधी गवळणी कधी भारुड तर कधी भूपाळी कानावर पडायची. आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं. कारण विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेल्या या वारकऱ्यांना याचा अभंगातून एनर्जी मिळत असे. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सोबत चालणारे हे अभंग हेच वारकऱ्यांसाठी जणू बूस्टर डोस असायचे.



सासवडहून निघालेला हा वैष्णवांचा मेळा सकाळी नऊ वाजेपर्यंत बोरावके मळा येथे पोहोचला असता. सासवड ते जेजुरी या मार्गातील हा पहिला न्याहारीचा विसावा. त्यानंतर दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वारकरी यमाई मंदिर परिसरामध्ये घटकाभर थांबले असते. याच ठिकाणी माऊलींचे मानकरी आणि वारकऱ्यांना दुपारचे जेवण मिळाले असते. तोपर्यंत तिकडं जेजुरी नगरीमध्ये सकाळपासूनच वारकर्‍यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या खाण्या-पिण्यासाठी, राहण्याच्या व्यवस्थेसाठी जेजुरीतील आबालवृद्ध झटताना पाहायला मिळाले असते.


अहं वाघ्या,सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी
सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी
मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी..


दुपारचा विसावा आटोपल्यानंतर माऊलीचा पालखी सोहळा जेजुरीकडे कूच करत असे. आता ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषासोबत यळकोट यळकोट जय मल्हार सुरु झालेला असायचा. एकदा साकुर्डीचा टप्पा ओलांडला की खंडोबाच्या भेटीसाठी आसूसलेला वारकरी वायुवेगाने पावले टाकत निघाला असता. अखंड लवथळेश्वर मंदिराजवळ पालखी पोहोचताच या ठिकाणाहून मल्हारी मार्तंडाचा गड दिसायचा यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष सुरु व्हायचा.


अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचत असत. जेजुरीला भक्ताची कधीच वनवा नाही. कारण वर्षभर या ना त्या कारणाने कायम जेजुरी खंडोबा भक्तांनी गजबजलेली असायची.


विठ्ठलाच्या दर्शनासाठी वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकीची वारी करणारे वारकरी कधीच आपली वारी चुकू देत नाहीत. अगदी तसेच वर्षातून दोन वेळा मल्हारी मार्तंडाच्या खंडोबाला भेटण्यासाठी सोमवती अमावस्येला राज्य आणि राज्याबाहेरुन भक्त जेजुरीला येत असतात. मात्र शेकडो वर्षांच्या परंपरेला कोरोनामुळे हरताळ फासला गेला. लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि 17 मार्चला खंडोबा मंदिर बंद करण्यात आले. अवघ्या पाच दिवसांवरती सोमवती आमावस्या आली होती. 23 मार्चला सोमवती आमावस्येच्या निमित्ताने मोठी यात्रा जेजुरीत भरली असती, मात्र कोरोनामुळे यात्रेला खंड पडला आणि आज आषाढी वारीच्या वारकऱ्यांविना जेजुरी सुनीसुनी वाटू लागली आहे.



जेजुरीमध्ये चाळीस वर्षांपासून पत्रकारिता करणारे प्रकाश खाडे सांगत होते की, "मागच्या साठ वर्षात कधी वारकरी आषाढी वारीला जेजुरीला आले नाहीत आणि माऊलीच्या पालखीवर भंडारा उधळला नाही असा दिवस आठवत नाही. आजच्या दिवशी वारीत चालणाऱ्या वासुदेवांना आम्ही न चुकता जेवण द्यायचो. आज मात्र आमच्या घरी कुणीच पोहोचणार नाही."


कडेपठार चढायला किमान दोन-अडीच तास लागतात. तरीही यातील अनेक वारकरी हा डोंगर चढून जायचे. खंडोबाच्या गडाला 380 पायऱ्या चढून वर यायच्या. बुक्क्याबरोबरच भंडाऱ्याचीही उधळण व्हायची. बायका फेर धरायच्या.. फुगडी खेळायच्या.


सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेजुरी नगरीमध्ये माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचला असता. पालखी मार्गावरील कमानीजवळ जेजुरीकरांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत झालं असतं. माऊलीच्या पालखीवर भंडारा उधळला गेला असता आणि माऊली पिवळी होताना पाहायला पंचक्रोशीतील आबालवृद्ध या पालखी मार्गावर गर्दी करुन जमा झाले असते. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात बेल भंडार उधळला गेला असता. वारी निघाली असते तर आज याच जेजुरी नगरीमध्ये शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाफ झाला असता. आजचा मुक्काम जेजुरीच्या पालखीतळावर झाला असता.


क्रमशः


यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे