कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचे बेलवाडीमध्ये पहिले गोल रिंगण पार पडले असते.. तर माऊलींच्या पालखीचे फलटणमध्ये शाही स्वागत झाले असते.


नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात,
अश्व धावता रिंगणी,नाचे विठू काळजात..


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर या वारकऱ्यांनी आपल्या एकूण मार्गातील अर्धा टप्पा पार केला असता. आतापर्यंत वारकरी एका मुक्कामाच्या ठिकाणावर निघायचे व दुसऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचे पर्यंत रस्त्यामध्ये ज्ञानोबा-तुकोबा चा जयघोष सुरु असायचा. चालता चालता थोडीशी उसंत मिळाली तरी रस्त्याच्याकडेला एखाद्या शेतामध्ये उभा टाकून लगेच कुठे भारुड सुरु व्हायचे तर कुठे गवळणीने ठेका धरलेला असायचा. म्हणजे सकाळी निघाल्यापासून रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत फक्त ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात शिवाय हा प्रवास शक्यच नाही.


जर वारी निघाली असती तर इथून पुढच्या प्रवासामध्ये वेगवेगळे खेळ वारकऱ्यांचे पाहायला मिळाले असते. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता चालत राहणाऱ्या वारकऱ्यांसाठी कुठे गोल रिंगण तर कुठे उभ्या रिंगणाची पर्वणी असायची.


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज सनसरला मुक्कामी असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीन बेलवाडीकडे प्रस्थान ठेवले असते. दोन ते अडीच किलोमीटर वरचा हा टप्पा. सकाळी सहा वाजताच तुकोबांच्या पालखीने प्रस्थान ठेवले असते साडेसात वाजेपर्यंत ही पालखी बेलवाडी मध्ये पोहोचली असती. सनसरहून बेलवाडीकडे जाणारा हा एकेरी रस्ता वारकऱ्यांनी भरुन गेला असता. तिकडे दिवस उजाडायला सुरुवात झालेली असायची आणि इकडे वारकऱ्यांचे पावलं बेलवाडीकडे पडत असायचे. तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान सुरु झाले तिथपासून अगदी बेलवाडीमध्ये ज्या जागेत रिंगण व्हायचे तिथपर्यंत वारकऱ्यांची अक्षरश: रांग लागलेली असायची.



सकाळी साडेसात वाजता रिंगण सुरु होणार म्हणून बेलवाडी परिसरातील लोक जागा धरुन बसलेले असायचे. भल्यामोठ्या काळ्याभोर शेतामध्ये एक छोटसं स्टेज तयार केलेले असायचे. याच ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जायची. सकाळपासूनच मोठा आवाज करुन ठेवलेला लाऊडस्पीकर चालू असायचा. "गर्दी करु नका", "रस्त्याच्या बाजूला थांबा", "गाड्या रस्त्यावर लावू नका" असा आवाज ज्या ठिकाणाहून यायचा तिथेच रिंगण आहे असे लोक गृहित धरायचे.



तुकाराम महाराजांची पालखी गावाच्या वेशीवर पोहोचली की तोफा लावून सलामी दिली जायची. गावातील शाळेतील मुलं लेझीमच्या ठोक्यावर आणि सनई चौघड्यांच्या निनादामध्ये पालखीला गावांमध्ये आणलं जायचं. गावात आलेल्या पालखीचे इंदापूर तालुक्याच्या प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराजांची पालखी रिंगण स्थळी मधोमध केलेल्या स्टेजवर ठेवली जायची. पालखीच्या अश्ववाचे पूजन झाले की रिंगण व्हायला सुरुवात झालेली असायची.


भगवे पताके खांद्यावर घेतलेले वारकरी आधी रिंगणात उतरायचे आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात धावत रिंगण पूर्ण करायचे. सत्तर ऐंशी वर्षाचे वृद्ध वारकरी सुद्धा वायुवेगाने या रंगांमध्ये पळताना पाहिलं की अंगावर शहारे यायचे. रिंगणामध्ये पळताना कधी कुणाचा धक्का कुणाला लागायचा..एखादा वारकरी मध्येच अडखळायचा. पण पुन्हा सावरुन तो सहकाऱ्यांसोबत जणू धावण्याची स्पर्धा करायचा. अंगामध्ये पांढरेशुभ्र सदरा आणि धोतर.. डोक्यावर पटका..या वारकऱ्यांच्या खांद्यावर घेतलेला भगवा पताका जणू आकाशाला भिडतोय असा भास व्हायचा.


त्यानंतर वीणेकरी रिंगणात धावत सुटायचा. एरवी रस्त्याने एकटे चालताना ही कदाचित यातील अनेक लोकांना त्रास होत असेल. मात्र हातात वीणा घेऊन धावणारी ही वयोवृद्ध मंडळी बघितली की देहभान विसरुन परमेश्वराशी एकरुप होणे काय असते. याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या वारकरी महिला रिंगणामध्ये धावायच्या. बहुतेक वेळा एखादा पाऊस यावेळी पडून गेलेला असायचा. चिखलामध्ये रुतलेला पाय पुन्हा त्याच वेगाने पुढे टाकताना डोक्यावर घेतलेली तुळशी वृंदावन तसूभरही हालू द्यायची नाही. हे बघितले की बॅलन्स या शब्दाचा खराखुरा अर्थ समजून यायचा.



या रिंगण सोहळ्याचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे धावणारा अश्व. जोपर्यंत मानाचा अश्व रिंगणातून धावत नाही तोपर्यंत हे रिंगण पूर्ण होत आहे. रिंगणाचा हाच क्षण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी लोक आतुर झालेले असायचे. एकदा मानाच्या आश्वा नि धावायला सुरुवात केली की एकच गलका व्हायचा. यावेळी ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाने झालेला जयघोष अवघे असमंत व्यापून टाकत असे. गोल रिंगण करताना घोडा रिंगण सोडून बाहेर जाऊ नये म्हणून गोलाकार रिंगणामध्ये अनेक जण थांबलेले असायचे. हा अश्व धावत जायचा तिथली माती हे लोक आपल्या कपाळी लावत असायचे.



अश्व पाच वेळा गोलाकार रिंगणाला फेऱ्या मारुन गेला की रिंगण पूर्ण व्हायचे आणि तिथून सुरु व्हायचा तो वारकऱ्यांच्या उडीचा खेळ. क्षणार्धात सगळे वारकरी एकत्र यायचे आणि एकाच सुरांमध्ये टाळांचा आवाज कानावर पडायचा. सकाळपासून जागा धरुन बसलेली मंडळी आता घराकडे निघायची. कारण आता या गावकऱ्यांना त्यांच्या घरी असलेल्या पाहुण्यांना जेवण देण्यासाठीची गडबड असायची.


मागच्या वर्षी रिंगण पार पडल्यानंतर मी आणि माझी सहकारी अक्षरा चोरमारे आणि आमचे कॅमेरामन्स. आम्ही सनीच्या घरी जेवायला गेलो होतो. मी आतापर्यंत ज्या-ज्यावेळी वारी कव्हर करायला बेलवाडीला गेलो तर इतर वारकऱ्यांप्रमाणेच आमचाही जेवणाचा बेत सनीच्या घरी ठरलेला असायचा. पालखी गावात येणे म्हणजे जणू या गावकऱ्यांसाठी सण असायचा.


"आतापर्यंत ज्या वेळी पालखी आमच्या गावात आली की आमच्या घरी आमच्या बहिणी, मावशी, मामा, भाऊजी भाचे असे न चुकता आजच्या दिवशी आमच्या घरी यायचे मात्र या वर्षी वारीच आली नाही. त्यामुळे आमच्या घरी कुणी सुद्धा कोणी आलं नाही" अशी खंत सनी जामदार बोलून दाखवत होता.


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा बेलवाडी, शेळगाव फाटा. अंथरुने मार्गे पुढे निमगाव केतकीला मुक्कामाला पोहोचला असता.


माऊलींची पालखीचे ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये शाही स्वागत झाले असते.



प्रथेप्रमाणे आज वारी निघाली असते तर माऊलींचा पालखी सोहळा हा प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये पोहचला असता. पहाटे सहा वाजताच तरडगावहून माऊलींच्या पालखी सोहळ्याने फलटणसाठी प्रस्थान ठेवले असते. प्रस्थाननंतर हे वारकरी सुरवडी येथे न्याहारीसाठी थांबले असते त्यानंतर निंभोरा येथे दुपारचे जेवण करुन क्षणभर विसावलेले वारकरी पुन्हा फलटणच्या देशाने निघाले असते.



फलटण शहरामध्ये पोहोचलेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचं शहराच्या हद्दीमध्ये येताच, नगराध्यक्ष आणि प्रशासनाच्या वतीने स्वागत पार पडले असते.



माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो सगुणामातानगर.. सदगुरु हरीबुवा मंदिरासमोरुन पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. असता याच ठिकाणी आलेल्या पालखीचे स्वागत करण्याची मोठी परंपरा नाईक निंबाळकर घराण्याकडे आहे. प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे शाही स्वागत पार पडले असते.


सायंकाळपर्यंत सगळे वारकरी फलटण शहर आणि परिसरामध्ये पोहोचले असते. पालखी विमानतळावर पोहोचलेल्या पालखीच्या दर्शनासाठी फलटणकरांनी मोठ्या रांगा लावल्या असत्या. फलटणमध्ये माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचल्यानंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो तो म्हणजे समाज आरतीचा. तसे पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आरती करण्याची परंपरा आहे, मात्र फलटण शहरामध्ये विमानतळ परिसर इतका मोठा आहे की हजारो लोक या आरतीला हजेरी लावत असायचे.


महानुभाव आणि जैन पंथियांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी आलेले वारकरी ऐतिहासिक राम मंदिर आणि जबरेश्वर मंदिरात दर्शनासाठी अक्षरश रांगा लावत असायचे.


क्रमशः


यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे


आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज माऊलींच्या पालखीचे पाहिले उभे रिंगण पार पडले असते!