(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray : लोकसभेनंतर ठाकरे गटाचं 'मिशन विधानसभा', आदित्य ठाकरेंचे विधानसभानिहाय दौरे सुरू
Shiv Sena Aaditya Thackeray : कर्जत आणि उरण विधानसभेपासून आदित्य ठाकरे त्यांचा दौरा सुरू करणार असून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.
मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीकडून आतापासूनच विधानसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं दिसून येतंय. ठाकरे गटानेही आता मिशन विधानसभा हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे मंगळवारपासून राज्यातील विधानसभा निहाय दौरा सुरू करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरूवात कर्जत आणि उरण विधानसभेपासून करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे उद्यापासून म्हणजे 16 जुलैपासून विधानसभा निहाय दौरे सुरू होणार आहेत. मावळ लोकसभेतील पराभवानंतर आदित्य ठाकरे हे कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार आहेत. आगामी विधानसभेच्या दृष्टीने आदित्य ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मंगळवारी दुपारी 2.30 वाजता कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल येथे आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर सायंकाळी 5 वाजता उरण विधानसभा येथील जेएनपीटी येथील मल्टीपर्पज हॉल येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 30 उमेदवार निवडून आले तर सांगलीतील विशाल पाटलांनीही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या 31 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या ठाकरे गटाकडून आता विधानसभेची तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसून येतंय.
महाविकास आघाडीची विधानसभेची तयारी सुरू
महाविकास आघाडीकडून लवकरच मुंबईमध्ये राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. एकप्रकारे भव्य सभा असेल, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे यश महाविकास आघाडीला प्राप्त झालं. त्यासंदर्भात मतदारांचा धन्यवाद दिले जाईल, आभार मानले जातील आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल अशी माहिती आहे. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं, महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील या सगळ्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली.
जागावाटपाबाबत काय ठरलं?
महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचा आयोजन केले जाणार आहे. महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास आपण लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही चांगलं यश मिळवू शकतो, हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे. जागावाटपसंदर्भातील बैठकांना सुद्धा लवकरच सुरुवात केली जाणार असून जागा वाटपाच्या सूत्रसंदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे.
ही बातमी वाचा: