मोठी बातमी : स्वच्छ दिलाने एकत्र यायचं ठरवलं, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं भाष्य
Aaditya Thackeray : साद-प्रतिसाद आणि टाळी देणं हे सुरुच असतं. पण आम्ही महाराष्ट्र हितासाठी बोलतोय. त्यासाठी जो कोणी येईल त्याला सोबत घेऊ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र (MNS Shiv Sena Thackeray Alliance) येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत राहू असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीचे संकेत दिले. आमचं राजकारण सेटिंगचं नाही तर स्वच्छ दिलाने एकत्र यायचा विचार आम्ही करत असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी हे भाष्य केलं.
राज ठाकरेंनी युतीसाठी टाळी दिल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पण त्याला बराच वेळ गेला तरी दोन्ही बाजूंकडून काही हालचाली सुरू नव्हत्या. आता या चर्चांना पुन्हा एकदा काहीशी गती मिळण्याची शक्यता आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
MNS Shiv Sena Thackeray Alliance : महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊ
आदित्य ठाकरे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. साद-प्रतिसाद, टाळी हे चालूच असते. पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय. सेटिंगचं राजकारण करणार नाही, आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही."
खासदार संजय राऊत यांच्या नरकातले स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, "पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, मी पुस्तक वाचले नाही. संजय राऊत यांनी पक्षासाठी तुरुंगवास भोगला. जे तुरुंगात जाण्यास घाबरले, ते सगळे भाजपच्या वॉशिंगमशीन मध्ये गेले. भाजप ने आमचा पक्ष फोडला. ती नीच प्रवृती आहे."
Uday Samant Meet Raj Thackeray : उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट
एकीकडे राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेच्या युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच उद्योगमंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली असताना सामंतांनी तिसऱ्यांदा राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे ही भेट अनौपचारिक असल्याचं सामंतांनी सांगितलं असलं तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघाता या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
























