74 देशातील बापुंच्या तिकिंटाचा संग्रह, कोल्हापूरच्या विजय जोशी यांचा छंद
जगभरातील 74 देशांनी गांधींजीची दोनशेहून अधिक टपाल तिकिटं प्रकाशित केली आहेत. त्याचा सगळा संग्रह कोल्हापूर जिल्ह्यातील विजय जोशींकडे आहे.
कोल्हापूर : महात्मा गांधी यांचे 150 वे जंयती वर्ष संपूर्ण भारतात साजरे केले जाते. मात्र गांधीजींचा हा जयंती सोहळा केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तर जगभरातील अनेक देश विविध पद्धतीनं हे जयंती वर्ष साजरं करत आहेत. याच जयंती सोहळ्याचा भाग म्हणून जगभरातील 74 देशांनी गांधींजीची दोनशेहून अधिक टपाल तिकिटं प्रकाशित केली आहेत. त्याचा सगळा संग्रह कोल्हापूर जिल्ह्यातील विजय जोशींकडे आहे.
कोल्हापूरच्या विजयकुमार जोशी यांच्या घरामध्ये ‘वर्ल्डस महात्मा’ या नावानं हा संग्रह आहे. त्यांच्याकडे एक दोन नव्हे तर तब्बल 74 देशांनी महात्मा गांधींची प्रकाशित केलेली टपाल तिकिट आहेत. दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, इराण, इराक, श्रीलंका अशा 74 देशांनी बापुंची टपाल तिकिटं प्रकाशित केली आहे .त्यातील दुर्मिळ टपाल तिकिटांचा संग्रह विजयकुमार जोशी यांनी केला आहे. या दोनशे टपाल तिकिटांपैकी काही तिकिटं केवळ यांच्याकडेच आहेत.
जोशी यांना महात्मा गांधींच्या टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद शालेय वयात असताना लागला. आज साधारण 50 वर्षे झाली. एक एक करत त्यांनी 74 देशातील 200 दुर्मिळ तिकिटांचा संग्रह केलाय. ही टपाल तिकिट मिळवणं हे दिसतं तितकं सोप काम नाही. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणे, काही देश मोजकीच तिकिट काढत असतं त्यातील एक आपल्या संग्रही असावं यासाठी जोशी कायम धडपडत असतात. मलेशिया देशानं तर केवळ 100 तिकिटं काढली होती. त्यातील एक जोशींकडे आहे आणि 99 तिकिटं मलेशियातीलच एका व्यक्तीनं घेतली.
विजयकुमार जोशी यांच्याकडे केवळ महात्मा गांधी यांच्या टपाल तिकिटांचा संग्रह नाही तर गांधीजींची चांदीची नाणी देखील आहेत. त्यामध्ये दांडी यात्रेचं चित्र असलेलं देखील आहे. अनेक दिवसांपासून विजयकुमार यांना हा संग्रह जनतेसमोर आणायचा होता. मात्र तसा योग आला नाही आणि आता तर कोरोनामुळं ते शक्य झालं नाही.