(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटिची बैठक, समरजितसिंह घाटगे यांचं कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन, आज दिवसभरात
6th July Headline : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. दिल्लीत आज राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे.
6th July Headline : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. दिल्लीत आज राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..
राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटिची बैठक -
दिल्लीत आज राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. पवारांच्या निवास्थानी बैठक होणार आहे. याच वर्किंग कमिटी मध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणाचे बहुमत दिसणार यावरही कायदेशीर लढाईचं भवितव्य अवलंबून आहे.
राष्ट्रपतींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा दिवस -
नागपूर/मुंबई – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रपती विशेष असुरक्षित आदिवासी समुहाच्या (PVTG) सदस्यांशी नागपूरमधील राजभवन येथे संवाद साधणार आहेत. मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी स्वागत समारंभाला उपस्थित रहाणार आहेत.
मुंबई – आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खाते वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज सकाळी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस चर्चगेट मुंबई येथे होणार आहे.
अकोला - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज अकोल्यात असतील. दिवसभर घेणार कार्यकर्ते आणि नेत्यांच्या गाठीभेटी.
मुंबई – जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी सांगता समारंभ आणि जवाहर या पुस्तकाच्या अनावरण सोहळ्याला शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित रहाणार आहेत.
पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पाऊस -
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीये. मुंबई, ठाण्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भातही आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
समरजितसिंह घाटगे यांचं शक्तीप्रदर्शन
कोल्हापूर – हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्याने नाराज झालेले समरजितसिंह घाटगे यांचे आज कागलमध्ये शक्तीप्रदर्शन असणार आहे, सकाळी 10 वाजता. या कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
नाशिक – शरद पवार 8 तारखेला नाशिकच्या येवला छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात उत्तर महाराष्ट्रतील पहिली सभा घेणार आहेत. आजच्या सभेतही त्यांनी भुजबळ यांच्यावर हल्ला केला. आता थेट मतदारसंघातच जाणार आहेत. याच आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक होणार आहे.
चंद्रपूर – चंद्रपूर शहराजवळ असलेल्या राम सेतू पुलावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर ते दाताळा परिसराला जोडणारा हा पूल इरई नदीवर बांधण्यात आला असून केबल स्टे पूल म्हणजे झुलणारा पूल म्हणून याला राम सेतू नाव देण्यात आलं आहे. विद्युत रोषणाई मुळे चंद्रपुरात हे आकर्षणाचं नवीन केंद्र बनणार आहे.
मुंबई – फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापुरात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या हसन मुश्रीफांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. याप्रकरणातील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास हायकोर्टानं पोलिसांना मनाई केली आहे. मुश्रीफांनी दाखल केलेल्या या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे.
दिल्ली – राजस्थानमधल्या कॉग्रेस अंतर्गत नाराजीवर तोडगा काढण्यासाठी आज महत्वाची बैठक होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वेणुगोपाल, रंधावा, सचिन पायलट आणि महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत. तर अशोक गहलोत बैठकीत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहे.
दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि राजस्थान दौऱ्यावर असणार आहेत. मोदींच्या 36 तासांच्या दौऱ्यात 5 शहरांमध्ये एक डझन पेक्षा जास्त कार्यक्रम होणार आहेत. चार राज्यांना 50 हजार करोड रूपयांच्या 50 योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे.
दिल्ली – गर्भ लिंग निदान चाचणीवर रोख लावणाऱ्या पीएनडीटी कायद्याची सक्तीने अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सुप्रिम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे.