Pandharpur News : भंगारवाल्याच्या प्रतापामुळे 69 नवजात शिशू मरणाच्या दारात, डॉक्टारांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात प्राण वाचले
इन्व्हर्टरचा प्राण असलेल्या बॅटरी चोरल्यामुळे काही मिनिटांसाठी हॉस्पिटलची सर्वच वीज गायब झाली आणि लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात असलेली 69 नवजात शिशु तडफडू लागले.

पंढरपूर : एका भंगारवाल्याने लहान मुलांच्या हॉस्पिटलमधील जनरेटरची बॅटरी पळवली आणि त्याच्या या मुर्खपणामुळे तब्बल 69 नवजात शिशु मरणाच्या दारात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर येथे घडला. सध्या विजेचा लपंडाव महाराष्ट्राला नवीन नाही त्यामुळे सर्वच हॉस्पिटलमध्ये मोठं मोठे जनरेटर आणि इन्व्हर्टर सेट वापरुन हॉस्पिटलचे अतिदक्षता विभाग सुरु ठेवला जातो. या इन्व्हर्टरचा प्राण असलेल्या बॅटरी चोरल्यामुळे काही मिनिटांसाठी हॉस्पिटलची सर्वच वीज गायब झाली आणि लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात असलेली 69 नवजात शिशु तडफडू लागले. तातडीने डॉक्टर शीतल शहा आणि त्यांच्या टीमने दुसऱ्या बॅटरी तातडीने बसवून हा वीज पुरवठा सुरु केला आणि या मुलांचे प्राण थोडक्यात वाचले.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात लहान मुलांचे हॉस्पिटल म्हणून पंढरपूर येथील डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटलचे नाव घेतले जाते. सर्व प्रकारची अत्यंत अद्ययावत मशिनरी, तज्ज्ञ वैद्यकीय स्टाफ यामुळे राज्यभरातील अनेक क्रिटिकल केसेस उपचारासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. त्यांच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात 100 पेक्षा जास्त नवजात शिशूंवर शस्त्रक्रिया आणि उपचार होत असतात. काल (19 मे) दुपारी एकाच्या सुमारास अचानक वीज गेल्यावर जनरेटर सुरु करण्यासाठी त्यांचे कर्मचारी गेले असता एक भंगारवाला तेथील बॅटरी वायर तोडून चोरुन नेत असताना दिसला. त्याला अडवण्याचा प्रयत्न करताच त्याने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन बॅटरी तेथेच टाकून पळ काढला. मात्र ही बॅटरी चोरताना त्याने वायर कापून टाकल्या. पुन्हा वीज पुरवठा तातडीने सुरु करण्यासाठी या वायर जोडून नवीन बॅटरी लावल्या आणि पुन्हा वीज पुरवठा काही मिनिटात सुरु झाला. मात्र यावेळी अतिदक्षता विभागात 60 नवजात आणि क्रिटिकल बालके दाखल होती. यावेळी युद्धपातळीवर प्रयत्न झाल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला आणि सर्व उपकरणे पूर्ववत झाली.
सुदैवाने या कालावधीत कोणत्याही बालकाच्या प्राणावर बेतले नाही. मात्र हे सर्व सुरु असताना या नवजात बाळांचे पालक मात्र अतिशय घाबरलेले होते. पण भंगारवाल्याच्या मूर्खपणाची किंमत या 69 नवजात बालकांना जिवाच्या मोबदल्यात चुकवावी लागली असती. या घटनेनंतर सर्वच हॉस्पिटलकडून या पर्यायी वीज पुरवठ्याच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने यंत्रणा उभी करणे आवश्यक असून अन्यथा किरकोळ चोरीसाठी कोणी काही उद्योग केला तर मोठी दुर्घटना घडू शकते याचा विचार करावा लागणार आहे. यानंतर पोलिसांनी या भंगारवाल्याला पकडले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पण ती वेळ डॉक्टर शीतल शहा आणि त्यांच्या स्टाफने समयसूचकता दाखवत हाताळली आणि मोठी दुर्घटना टळू शकली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
